पनवेल : पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गाव तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील ४ गाव आणि १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच या ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यास सुरुवात केली जाणार आहे.उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला असून एप्रिल महिना संपत आलेला आहे. त्यामुळे अनेक गाव, वाड्या पाण्यावाचून हैराण झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत पनवेलमधील ४ गाव व १४ वाडीतील १८ विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास प्रत्येकी विंधन विहिरीला ५० हजार रुपयांप्रमाणे १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. माणघर, पाटनोळी, मोसारे, नानोशी ही ४ गावे तर ताडाचा टेप, हाल्टेप, कोंडले, चिंचवाडी, पोयंजे कातकरवाडी, तुराडे ठाकूरवाडी, पाली कातकरवाडी, तुराडे आदिवासी वाडी, सांगुर्ली फणसवाडी, गुळसुंदे आदिवासीवाडी, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, आवळीचा माळ मोसारे, नानोशी कातकरवाडी या १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे, तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील १८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. एप्रिल महिना उजाडून २४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत आहे. पशू-पक्षीदेखील पाण्याच्या शोधात आहेत. दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू झाली आहे. तर काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणी नसल्यामुळे आदिवासीवाडीतील नागरिक अद्यापही तहानलेलेच आहेत. पाण्याची पातळी खालवल्याने चिंतेची बाब आहे; परंतु पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी विंधन विहीर खोदाईचा पर्याय पुढे आला आहे. तालुक्यातील ४९ गाव-वाड्यात ५२ विंधन विहिरी खोदण्यासाठी सुचवले होते. सहायक भू वैज्ञानिक रायगड जिल्हा परिषद यांनी सर्वेक्षण करून १८ गाव-वाड्यांना विंधन विहिरी मंजूर करून दिल्या. शहर आणि गोड्या भागातील विहिरींची सफाई करून विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी करणे गरजेचे आहे.
पनवेलमध्ये खोदणार १८ विंधन विहिरी
By admin | Published: May 02, 2017 3:12 AM