बांधकाम व्यावसायिकाकडून १८ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:45 PM2019-07-14T23:45:00+5:302019-07-14T23:45:04+5:30
सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे.
पनवेल : सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे.
खारघर कोपरा येथील सेक्टर १० मध्ये राहणारे शिवराम प्रभाकर सुतार (३१) यांनी येथील एकता कन्स्ट्रक्शन या सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांच्याकडे रूम घेण्यासाठी पैसे गुंतवले होते. २०१२ मध्ये त्यांनी १८ लाख २० हजार रुपये रोख रक्कम व बँकेतील लोन मंजूर करून बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. बांधकाम व्यावसायिकाने सह दुय्यम निबंधक कार्यालय पनवेल येथे त्यांना रूमचा दस्त नोंदणीकृत करून दिला आहे. या वेळी बांधकाम व्यावसायिकाने सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा बनावट नकाशा त्यांना दाखवला. विकासक एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा यांनी रूमचे भोगवटाप्रमाणपत्र लवकरच भेटेल व लगेच सदर रूमचा ताबा मिळेल, असेही सुतार यांना सांगितले होते. मात्र, बिल्डिंगचे काम पूर्ण झाले तरी ताबा न दिल्याने सुतार यांनी एकता कन्स्ट्रक्शनचे भागीदार सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांना २०१४ मध्ये वकिलांमार्फत नोटीस दिली होती. सुतार यांनी सिडको कार्यालयामध्ये इमारतीबद्दल चौकशी केली असता सिडकोने सदर बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे समजले. त्यामुळे रूम ताब्यात देण्याबाबत बिल्डरकडे त्यांनी तगादा लावला असता बांधकाम व्यावसायिकांनी शिवीगाळ करून त्यांना चेक बाउंसच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुलै २०१९ मध्ये सुतार यांनी खारघर पोलीस ठाण्यात सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद अशान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.