१८ महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, कामोठेतील एमजीएमधून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:40 AM2020-04-28T04:40:14+5:302020-04-28T04:40:27+5:30
संसर्गजन्य आजारावर यशस्वी मात केल्याने चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमजीएम रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
पनवेल : गेल्या आठवड्यात कामोठे एमजीएममध्ये दाखल करण्यात आलेल्या १८ महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. उरण तालुक्यातील जासई येथील १८ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याने आठवडाभरापूर्वी कामोठे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संसर्गजन्य आजारावर यशस्वी मात केल्याने चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एमजीएम रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या वेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, कामोठे एमजीएमचे डॉक्टर्स तसेच परिचारिकांचा स्टाफ उपस्थित होता. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात बाळाला निरोप दिला.