फी भरली नाही म्हणून १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, उरणच्या युईएस इंग्रजी शाळेतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 07:01 PM2022-09-15T19:01:54+5:302022-09-15T19:02:38+5:30

शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात  पालक- शिक्षक संघटनेचा जोरदार संघर्ष

18 students expelled for non payment of fees UES English School in Uran | फी भरली नाही म्हणून १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, उरणच्या युईएस इंग्रजी शाळेतील प्रकार 

फी भरली नाही म्हणून १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, उरणच्या युईएस इंग्रजी शाळेतील प्रकार 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : शाळेची फी भरली नाही म्हणून येथील नामांकित इंग्रजी युईएस शाळेतील ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. यामुळे संतप्त झालेल्या पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी (१५) जोरदार संघर्ष निर्माण झाला.

उरण येथील उरण एज्युकेशन संस्थेच्या (युईएस) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १ ते १२ पर्यत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये गरिब-गरजू सफाई कामगार,  रिक्षावाल्यापासून मोठ्या श्रीमंतांपर्यतची मुले शिक्षण घेत आहेत. कधी भरमसाठ करण्यात आलेली फी वाढ आणि संस्थेने चालविलेल्या मनमानी कारभारामुळे येथील विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळापासून थकित असलेल्या गरीब विद्यार्थी, पालकांना शाळेकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्याविरोधात याआधीच पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. यामध्ये आजच्या घटनेची भर पडली आहे.

गुरुवारी (१५) सकाळीच शाळा सुरू होताच  शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना चार तास बाहेर उभे केले. मेसेज, फोन करून पालकांनाही बोलावून घेतले. पालक- विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी अपमानित केले. यामुळे शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या काही पदाधिकारी आणि सदस्यांनी थेट शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनालाच जाब विचारला. यामुळे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला.

एका नम्रता मढवी या महिलेने सातवीत शिकत असलेल्या मुलाच्या थकित असलेल्या पाच हजार रुपये फीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवून दोन दिवसांपूर्वीच २५०० रुपये भरले आहेत. उर्वरित फी येत्या चार आठ दिवसात भरण्याचे सांगितले होते. मात्र शिक्षक, व्यवस्थापनाने अशा विद्यार्थ्यांलाही वर्गाबाहेर काढून घोडचुक केली आहे. हा विद्यार्थी पालकांवर अन्याय आहे. त्यामुळे मुजोर शिक्षक, व्यवस्थापनाने माफी मागितली पाहिजे.

ॲड.प्राजक्ता गांगण, उपाध्यक्ष
युईएस पालक-शिक्षक संघटना

विद्यार्थी-पालकांवर अन्याय झाला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना काळापासूनच विद्यार्थी-पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली जात आहे. याआधीही १३० विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेण्यात आला होता.थकित फी बाबत निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालक संघटना, व्यवस्थापन यांची बैठक घेतली जाईल.विद्यार्थी-पालक यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठीही  दक्षता घेतली जाईल.
मिलिंद पाडगावकर, उपाध्यक्ष
उरण एज्युकेशन सोसायटी

Web Title: 18 students expelled for non payment of fees UES English School in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.