हेटवणे धरणात १८ हजार एमएलडी पाणी साठा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:43 AM2018-05-14T05:43:23+5:302018-05-14T05:43:23+5:30

हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले

18,000 MLD water storage in the Hetavane dam | हेटवणे धरणात १८ हजार एमएलडी पाणी साठा पडून

हेटवणे धरणात १८ हजार एमएलडी पाणी साठा पडून

Next

अरुणकुमार मेहत्रे 
कळंबोली : हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे. मुबलक पाणी असूनही केवळ व्यवस्था नसल्याने सिडको वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या अनियमित, अपुºया पाणीपुरवठ्यावर सिडकोला वसाहतींची तहान भागावी लागत आहे.
पेण परिसरात ८६.३५ कोटी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने सिडकोच्या सहकार्याने हेटवणे धरण बांधले. याकरिता सिडको प्रशासनाने ४७ कोटी रुपये खर्च केले असून त्या बदल्यात पाटबंधारे विभागाने सिडकोला पाणी देण्याचा करार केला आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४७.४९ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यापैकी १४४.९८ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा उपयुक्त आहे. हेटवणे धरणातील पाणी साठ्यापैकी सिडको प्रशासन तसेच सिंचन याकरिता पाणी विभाजन करार करण्यात आला. त्यामध्ये १०० एमएलडी पाणी सिडकोला देण्याची अट ठेवण्यात आली होती. हा करारनामा बदलून पाणी कोटा ५० ने वाढून तो १५० एमएलडी करण्यात आला आहे. त्यामुळे धरणात सिडकोकरिता आरक्षित पाणी मोठ्या प्रमाणात असून त्याचा वापर होत नाही.
सिडकोने या ठिकाणाहून जलवाहिनी पूर्वीच टाकली असून तिची क्षमता अतिशय कमी असल्याने आवश्यक पाणी सिडको वसाहतींना देताच येत नाही. त्याचबरोबर पंपिंगची क्षमताही अत्यल्प आहे. त्यामुळे येणारे पाणी कमी दाबाने येते. सिडको प्रशासनाने हेटवणे धरणातील पाणीपुरवठ्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास अनेक वसाहतींतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली लागण्याची शक्यता आहे.

सिडकोला दरवर्षी ५४,७५० इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी सिडको वर्षाला फक्त ३६,५०० एमएलडी पाणीच वापरते. म्हणजे १८,२५० एमएलडी पाणी धरणात शिल्लक राहते. आता आणखी पन्नास एमएलडी इतका कोटा वाढला आहे. सिडको वसाहतीला दररोज २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणी कमी पडते याचे कारण म्हणजे पंपिंग क्षमता कमी आहे. त्याचबरोबर ते पाणी उचलण्याकरिता कोणतीच व्यवस्था नाही. आम्ही केलेल्या मागणीनुसार त्यांनी हेटवणे कळंबोली ग्रीडचे काम हाती घेतले आहे.
- आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते
कळंबोलीहेटवणे-कळंबोली ग्रीडचे काम रखडले आहे ही वस्तुस्थिती आहे. संबंधित विभागाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर उरलेले काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हेटवणे धरणातील पाणी सिडको वसाहतींना थेट देता येईल. एमजेपी आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. - दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग, सिडको.

Web Title: 18,000 MLD water storage in the Hetavane dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.