बसथांब्यातून एनएमएमटी मिळविणार १९ कोटी; बीओटीवर ७९ थांब्याचा विकास, प्रवाशांना मिळणार दिलासा
By नारायण जाधव | Published: December 3, 2022 08:20 PM2022-12-03T20:20:10+5:302022-12-03T20:20:44+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमएमटीने शहरातील आपल्या ७९ बसथांब्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने अर्थात एनएमएमटीने शहरातील आपल्या ७९ बसथांब्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार हे बसथांबे बीओटीवर खासगी ठेकेदारास बांधण्यात येणार असून त्या बदल्यात त्याला जाहिरातींचे हक्क बहाल करण्यात येणार आहेत. यातून महापालिकेने कमीत कमी १९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असल्याचे परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सध्या महापालिकेच्या विविध बसथांब्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी ते मोडकळीस आल्याने तेथे बसण्यास प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक बसथांब्याच्या ठिकाणी भिकाऱ्यांनी आसरा घेतला आहे. महापालिका मुख्यालयासमोरील बसथांब्याचा अशाप्रकारे बेवारस नागरिकांनी आसरा घेतल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. हे ओंगळवाणे दृश्य नवी मुंबईसारख्या स्वच्छ आणि सुंदर शहराला लाजवणारे आहे. यात काही ठिकाणी नवे प्रवासी बसथांबे उभे करण्यात येणार आहेत.
फुकट्यांमुळे होणारे नुकसान टळणार
याशिवाय शहरांतील मुख्य रस्त्यांवरील अनेक बसथांब्यावर कथित राजकीय नेत्यांसह त्यांचे बगलबच्चे आणि माजी नगरसेवकांनी फुकटची जाहिरातबाजी सुरू केल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. यातून महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे उत्पन्नही बुडत आहे. अशा फुकट्यांना आळा घालून आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी एनएमएमटी प्रशासनाने शहरातील ७९ बसथांबे बीओटीवर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ वर्षे जाहिरात प्रसारण हक्क देणार
एनएमएमटी नवी मुंबईतील ७९ बसथांबे बीओटीवर खासगी ठेकेदारास बांधण्यास देणार आहे. यात सर्व खर्च तो ठेकेदारच करणार असून या बदल्यात त्याला १५ वर्षे या बसथांब्यावर जाहिरात प्रसारणाचे हक्क देण्यात येणार आहेत. या १५ वर्षांच्या काळात संबंधित ठेकेदारच त्यांची देखभाल दुरुस्ती करणार आहे. शिवाय त्याच्याकडून उपक्रमास १९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. - योगेश कडुस्कर, महाव्यवस्थापक, एनएनएमटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"