कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा; दोन पॅकेजमध्ये मार्गाचे बांधकाम

By नारायण जाधव | Published: June 1, 2023 02:59 PM2023-06-01T14:59:03+5:302023-06-01T14:59:21+5:30

मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे राहणार आहे. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे.

19 tenders from 11 contractors for Kalyan-Taloja Metro line; Construction of the route in two packages | कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा; दोन पॅकेजमध्ये मार्गाचे बांधकाम

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा; दोन पॅकेजमध्ये मार्गाचे बांधकाम

googlenewsNext

नवी मुंबई : महामुंबईतील कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबई आणि पनवेल शहरांच्या विकासात महत्त्वाच्या असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो-१२ या २०.७५ किमीच्या मेट्रो मार्गासाठी ११ कंत्राटदारांनी १९ निविदा सादर केल्या आहेत. दोन पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या मार्गावर १७ स्थानके असणार आहेत. या कंत्राटदारांच्या तांत्रिक पात्रतेबाबत येत्या दोन महिन्यांत तपासणी करून त्यानंतर आर्थिक बीड उघडण्यात येणार आहेत.

मेट्रो-१२ हा मेट्रो-५ चा विस्तार असून, या प्रकल्पाचा एकूण खर्च ४४७६ कोटी इतका असून, यातील सर्व स्थानकांचे बांधकाम, फलाटांचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामासाठी १५२१ कोटींच्या कामांसाठी कंत्राटदार नेमणुकीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या हाेत्या. त्यानुसार ११ कंत्राटदारांच्या १९ निविदा सादर केल्या आहेत.

हे आहेत ते बोली लावणारे कंत्राटदार
ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
गवार कन्स्ट्रक्शन लि.
जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि.
कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लि.
केईसी इंटरनॅशनल लि.
लार्सन अँड टुब्रो लि.
एनसीसी लिमिटेड
एसएएम इंडिया बिल्टवेल
एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि.
आणि टाटा प्रोजेक्ट्स

पॅकेज सीए १८५ मध्ये कल्याण - कोळेगावपर्यंतचा समावेश असून त्यावर अंदाजे ७८३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पॅकेज सीए १८६ मध्ये कोळेगाव ते तळोजापर्यंतचा समावेश असून त्यावर अंदाजे ७३८.८० कोटी करण्यात येणार आहेत.

अशी राहणार १७ उन्नत स्थानके
या मार्गात १७ उन्नत स्थानके असणार आहेत. यात गणेशनगर, पिसावलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव या नऊ स्थानकांसह दोन्ही बाजूला फलाटासह स्टेशन हॉल उन्नत राहणार आहे; तर निळजेगाव, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे येथील स्टेशन इमारत व फलाट उन्नत राहणार आहे. तर तळोजा स्थानकात एकाच बाजूला ट्रॅक राहणार आहे. वडवलीत एकाच बाजूला ट्रॅक राहणार असून, सोबत आणखी एक अतिरिक्त ट्रॅक राहणार आहे.

पिसावेत राहणार डेपो
मेट्रो क्रमांक १२ चा प्रमुख डेपो पिसावे येथे राहणार आहे. यामुळे एमएमआरडीएला येथे मोठी जागा संपादित करावी लागणार आहे. डेपोमुळे भविष्यात या भागात मेट्रोची वर्दळ वाढणार आहे.

शीळफाटा-तळोजा-पनेवलला फायदा
या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे. येत्या काळात निळजेजवळ एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर उभे राहत आहे, तर शीळफाटा परिसरात लोढा, रुणवालसह इतर बांधकाम व्यावसायिकांच्या खासगी टाऊनशिप आकार घेत आहेत. याच भागात बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील एक स्थानक-डेपो दिवा-आगासन-म्हातार्डीत उभे राहत आहे.

तीन मेट्रो एकमेकांस जोडणार
सध्या काम सुरू असलेली ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसह कांजूरमार्ग-बदलापूर आणि कल्याण-तळोजा मेट्रो एकमेकास जोडल्या जाणार आहेत. यात भिवंडी-कल्याण मेट्रो ही मेट्रो १२ ही कल्याण येथेच जोडली जाणार असून, निळजेच्या आसपास ती कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला जोडली जाणार आहे.

Web Title: 19 tenders from 11 contractors for Kalyan-Taloja Metro line; Construction of the route in two packages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो