पनवेल शहरातील १० कोटींची विकासकामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:58 AM2019-08-08T00:58:43+5:302019-08-08T00:58:51+5:30
नगरसेवकाच्या उपोषणाची सिडकोने घेतली दखल
पनवेल : कळंबोली सिडको वसाहतीमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक रवींद्र भगत यांनी उपोषणाचे हत्यार उगारले होते. शहरातील विविध विकासकामांबाबत सिडकोची उदासीनता पाहून नगरसेवक रवींद्र भगत हे सिडको विरोधात उपोषणाला बसले होते. हे उपोषण मागे घेताना सिडकोने विविध आश्वासने भगत यांना दिली होती. त्याअंतर्गत दहा कोटींची कामे कळंबोलीत सिडको करणार आहे.
पनवेल महापालिका आणि सिडको यांनी एकत्रित केलेल्या सर्वेक्षणानुसार भगत यांनी मागणी केलेल्या विकासकामांची सुरुवात सिडकोने केली आहे. या संदर्भात सिडकोने भगत यांना लेखी पत्र दिले आहे. सिडको वसाहत असलेल्या कळंबोलीत मोठी गटारे बंदिस्त करणे, क्रिकेट मैदानाला स्टेडियम स्वरूपात बांधणी करणे, वन परिसरातील गटारे बंदिस्त करणे, तळमजल्यावरील नागरिकांच्या घरात घुसणाºया मलनि:सारण पाण्याचे नियोजन करणे आदी विविध मागण्यांसाठी कळंबोलीतील शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी सहा महिन्यांपूर्वी सिडकोविरोधात उपोषण केले होते. विविध १७ मागण्यांपैकी काही मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. सहा महिन्यांपूर्वी दिलेले लेखी आश्वासन सिडको पाळत नसल्याने भगत यांनी पुन्हा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना पत्र लिहून सिडकोविरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. ५ आॅगस्ट रोजी सिडकोविरोधात उपोषणाला बसण्याचा निर्धार केला होता. या पत्राची दखल घेत सिडकोचे कळंबोलीमधील कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी भगत यांच्या मागण्या मान्य करून विकासकामांना सुरुवात करण्यात आल्याचे त्यांना कळविले. पनवेल महापालिका आणि सिडकोने एकत्रित केलेल्या सर्वेक्षणानुसार दहा कोटी १७ लाख रुपयांच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे भगत यांना दिली.
सिडकोने विकासकामांसाठी केलेली तरतूद लवकर पूर्ण करावी. सिडकोने दिलेले आश्वासन पाळण्यासाठी सिडको प्रशासनाला वारंवार त्यांच्याच कामांची आठवण करून द्यावी लागते, ही शोकांतिका असल्याचे भगत यांनी सांगितले. सिडको नोड पालिकेकडे हस्तांतर करण्याची आवश्यकता आहे. हस्तांतराच्या कचाट्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी सांगितले.