लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बँकेत जमा केलेले क्रॉस चेक मिळवून अज्ञाताने ग्राहकाच्या खात्यातून रोकड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खातेधारकाच्या तक्रारीवरून कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही धनादेश "क्रॉस" असताना त्यावर रोकड देण्यात आल्याने यामध्ये बँकेचाही हलगर्जीपणा उघड झाला आहे.
कोपर खैरणे येथे राहणाऱ्या रामावतार गुर्जर यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचे कोपर खैरणे सेक्टर ५ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. डिसेंबर मध्ये रामावतार यांनी पत्नीच्या व एका नातेवाईकाच्या नावे राजस्थान येथील बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचे दोन क्रॉस धनादेश बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्स मध्ये जमा केले होते. मात्र चार दिवसांनी त्यांना सदर रक्कम रोख काढण्यात आल्याचा बँकेद्वारे मॅसेज आला. याबाबत त्यांनी बँकेत चौकशी केली असता दोन्ही धनादेशाद्वारे बँकेतून रोखीने पैसे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु बँकेत जमा केलेले धनादेश अज्ञाताने मिळवले कसे ? व धनादेश क्रॉस असताना त्याद्वारे रोकड कशी दिली ? याबाबत त्यांनी बँकेकडे चौकशी केली असता बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
तसेच त्यांना सीसीटीव्ही देण्यास देखील नकार देण्यात आला. यामुळे त्यांनी झालेल्या फसवणूक बद्दल कोपर खैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता वर्तवत त्यांचीही चौकशी करण्याची मागणी रामावतार यांनी केली आहे.