घणसोलीमध्ये २० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:48 AM2018-06-14T04:48:43+5:302018-06-14T04:48:43+5:30

पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत.

 20 kg of Ganja seized in Ghansoli | घणसोलीमध्ये २० किलो गांजा जप्त

घणसोलीमध्ये २० किलो गांजा जप्त

googlenewsNext

नवी मुंबई : पामबीच मार्गावर घणसोलीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीतील तीन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० किलो गांजा व कार हस्तगत केली असून तीनही आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील रहिवासी आहेत.
अटक केलेल्या आरोपींमध्ये इफ्तिकार मोहमद इब्राहिम अहमद, वसीम हकिम खान व रफिक सईद खान यांचा समावेश आहे. मालेगावमधील रहिवासी असलेले हे आरोपी गांजा विक्रीसाठी नवी मुुंबईमध्ये येणार असल्याची माहिती रबाळे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांच्या पथकाने १२ जूनला रात्री साडेअकरा वाजता सापळा रचला होता. एमएच ०६ एएफ १४०० या इंंडिका कारमधून आलेले तीन जण या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इफ्तिकार अहमद मोहंमद इब्राहिम अन्सारी याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६ किलो गांजा, ४०० रूपये रोख रक्कम, सॅमसंग मोबाइल व वाहन चालकाचा परवाना सापडला आहे. दुसरा आरोपी वसीम हकीम खान याच्याकडून ८ किलो गांजा, ५७० रूपये रोख रक्कम व मोबाइल फोन जप्त केला आहे. रफिक सईद खान याच्या ताब्यातून ६ किलो गांजा, मोबाइल फोन जप्त केला आहे. तीनही आरोपींकडे एकूण २० किलो गांजा सापडला आहे.
अटक केलेल्या आरोपींविरोधात रबाळे पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पहिल्यांदा गांजा तस्करीमध्ये नाशिकमधून आलेले आरोपी सापडले आहेत. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title:  20 kg of Ganja seized in Ghansoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.