अग्निशमन जवानांना २० लाखांचा अपघात विमा
By Admin | Published: May 16, 2017 12:56 AM2017-05-16T00:56:49+5:302017-05-16T00:56:49+5:30
अग्निशमन दलातील जवानांना सिडकोने वीस लाख रुपयांचा अपघात विमा देवू केला आहे. इतकेच नव्हे, तर कर्तव्यपूर्ती करताना मृत पावलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलातील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अग्निशमन दलातील जवानांना सिडकोने वीस लाख रुपयांचा अपघात विमा देवू केला आहे. इतकेच नव्हे, तर कर्तव्यपूर्ती करताना मृत पावलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत हे दोन निर्णय घेण्यात आले आहेत.
सिडकोचे द्रोणागिरी, खारघर, नवीन पनवेल आणि कळंबोली हे चार अग्निशमन केंद्रे आहेत, तर उलवे येथे नव्यानेच केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या पाचही केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिडकोच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या प्राणांचे व संपत्तीचे रक्षण करतात. यात अनेकदा या जवानांना आपला जीव गमवावा लागतो. जीवाची बाजी लावून जीवित व संपत्तीचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन जवानांना शहिदाचा दर्जा देण्याचा ठराव महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने मंजूर केला आहे. नगर विकास विभागाच्या या ठरावाच्या अधीन राहून सिडको महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सिडको मदतीचा हात देणार आहे. अग्निशमन दलातील वीरमरण प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शहिदाचा दर्जा देणारे सिडको हे देशातील पहिले महामंडळ ठरले आहे.
देशातील प्रत्येक अग्निशमन कर्मचारी अपघात विमा धोरणांतर्गत सुरक्षित असायला हवा. अग्निशमन विभागाचे काम पाहता कोणत्याही क्षणी कठीण प्रसंग ओढावू शकतो. गंभीर जखमी किंवा जीवित हानी होवू शकते. जखमी अवस्थेत संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी व त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, या हेतूने सिडकोने आपल्या अग्निशमन केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी २0 लाखांपर्यंतच्या अपघात विम्याचे प्रयोजन केले आहे.