कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विविध प्रकल्पांतील शिल्लक राहिलेल्या ९०२ घरांच्या विक्रीसाठी सिडकोने योजना जाहीर केली आहे. यात पंतप्रधान आवास योजनेतील २१३ घरांचा समावेश आहे. या घरांच्या किमती २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागाने घेतला आहे. या योजनेत खारघरमधील वास्तुविहार-सेलिब्रेशन, स्वप्नपूर्ती आणि व्हॅलिशिल्प या जुन्या प्रकल्पांतील ६८९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.
मागील पाच वर्षांत सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळपास पंचवीस हजार घरांची निर्मिती केली आहे. तर पुढील चार-पाच वर्षांत आणखी ८७ हजार घरे प्रस्तावित आहेत. त्यांपैकी ३० हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. असे असले तरी जुन्या प्रकल्पातील अनेक घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अडकून पडली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन गृहयोजना जाहीर करण्याअगोदर शिल्लक घरांचा निपटारा करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्यामुळे सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळेल.
संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीकृष्ण जन्माष्टमीपासून ९०२ घरांची योजना सुरू केली जाणार आहे. यात कळंबोली, खारघर व घणसोली या नोडमधील पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३८ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी १७५ अशा एकूण २१३ सदनिकांचा समावेश आहे. तसेच खारघरमधील गृहसंकुलातील एमआयजी आणि एचआयजी प्रवर्गासाठी बांधलेल्या ६८९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे ६ ऑगस्ट रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.