नवी मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळ पसरला आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. बहुतांशी धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे अनेक प्राधिकरणांनी आपापल्या क्षेत्रात पाणीकपात लागू केली आहे. सिडको महामंडळानेही मान्सूनपूर्व नियोजन म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात शनिवारपासून २० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे, त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना काटकसर करावी लागणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात मागील दोन-तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पनवेल शहरासह अनेक वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सिडको हेटवणे धरणातून आपल्या कार्यक्षेत्रातील वसाहतींना पाणीपुरवठा करते. तर काही प्रमाणात नवी मुंबई महापालिकेलाही पाणी देते. महापालिका क्षेत्रात समाविष्ट एमआयडीसीतील झोपडपट्टी वसाहतींना एमआयडीसीकडून घेतलेल्या ८० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु एमआयडीसीनेही गेल्या महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात केल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी वसाहतीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
महापालिकेकडून सिडकोला पाणीमोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते, तर जलकुंभातील जलसाठ्यापैकी जवळपास २७० एमएलडी इतके पाणी नवी मुंबईतील विविध उपनगरांना पुरविले जाते.