अलिबागमधील २० महिलांनी अनुभवली आनंदवारी

By admin | Published: June 23, 2017 06:02 AM2017-06-23T06:02:22+5:302017-06-23T06:02:22+5:30

मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते

20 women from Alibaug experienced joy | अलिबागमधील २० महिलांनी अनुभवली आनंदवारी

अलिबागमधील २० महिलांनी अनुभवली आनंदवारी

Next

जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मुखात विठुरायाचे नाम आणि जय जय रामकृष्ण हरीचा गजर, पायाला पंढरीच्या ओढीची भिंगरी, अशा रूपात विठ्ठलमय झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले होते. कोणी हरिपाठाचे वाचन करत होते, तर कोणी फुगडी खेळत, टाळ, मृदंगाच्या गजरात वारकरी तल्लीन होऊन पुढे जात होते. नाही भुकेची आस, नाही घशाला कोरड अशा अवस्थेत पुणे ते सासवड रस्ता भक्तिमय रंगात एक होऊन रंगून गेला होता आणि याच वारीत अलिबागमधील २० भगिनी सहभागी झाल्या होत्या.
पुणे ते सासवड अंतर ३२ किमी आणि पुढे माउलीचे मुक्काम ठिकाण १० किमी असे ४२ किमी अंतर आहे. पालखी काळातला सर्वात मोठा टप्पा तेही दिवसभर चालून सासवड मुक्कामी पोहचायचे अशा हेतूने कितीतरी दिंड्या निघाल्या होत्या. आम्ही पण मागील वर्षी आळंदी ते पुणे एक टप्पा पूर्ण करून, या दुसऱ्या टप्प्यात यंदा वानवडी-हडपसरमार्गे सकाळी साडेआठला चालायला सुरुवात केल्याचे या वारीत सहभागी कवयित्री अनिता जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिकडेतिकडे माउलींच्या नामाचा जयघोष करीत निघालेले वारकरी आणि असंख्य भाविक दिसत होते. काही वेळानंतर आम्हाला पालखीचे दर्शन झाले. पालखीपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली होती. आम्ही २० जणी पालखीमागोमाग निघालो. माउलीच चालण्याचे बळ देत होती, असे जोशी यांनी पुढे सांगितले.
दिवे घाटातून वारकरी जाताना मुंग्यांप्रमाणे दिसत होते, म्हणूनच बहुदा या घाटाला मुंगी घाट म्हणत असावेत. रस्त्याबरोबरच डोंगरही माणसांनी फुलून गेला होता. पालखी विश्रांतीसाठी थांबली असता माउलींच्या पादुकांवर मस्तक टेकवल्याचे भावना जोशी यांनी सांगितले.
वारीचा दुसऱ्या वर्षीचा टप्पा यशस्वी पार पडला. कवयित्री अनिता जोशी यांच्या समवेतच्या माधुरी जोशी, शुभांगी नाखे, उमा देशमुख, विद्या महाडेश्वर, राजश्री थळे, भारती वझे, स्मिता जोशी, स्मिता गोडबोले, वर्षा कुलकर्णी, स्वाती पित्रे, अ‍ॅड.स्वाती कुलकर्णी ,विदुला दातार, चित्रा लोंढे, कांचन पाटील, योगिता गवळे, मुग्धा मांजरेकर,अंजू दामले, प्रज्ञा जैन, राधिका खवासखान, नेहा रानडे, दीपा संत, रश्मी देव आणि ऋता मुळ्ये या सर्व २० भगिनी वारीत सहभागी झाल्या होत्या.

Web Title: 20 women from Alibaug experienced joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.