खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

By नामदेव मोरे | Published: June 16, 2024 06:20 PM2024-06-16T18:20:21+5:302024-06-16T18:20:46+5:30

६०० टन कचरा संकलित : पर्यावरण रक्षणासाठी ६० हजार नागरिकांनी दिले योगदान

200 cleanup campaign in 4 years on coast | खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

खाडीकिनाऱ्यावर ४ वर्षांत २०० स्वच्छता मोहिमा

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : खाडीकिनारा स्वच्छ करण्यासाठी २०२० मध्ये सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने नॉनस्टॉप २०० आठवड्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. नवी मुंबईत सुरू झालेली ही चळवळ मुंबई, ठाणे, पनवेलपर्यंत पोहोचली असून प्रत्येक रविवारी शेकडो पर्यावरणप्रेमी या अभियानात सहभागी होत आहेत. आतापर्यंत ६० हजार स्वयंसेवकांनी पर्यावरणरक्षणासाठी योगदान दिले आहे. खाडीतून ६०० टन कचरा काढण्यात यश आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील अनेक शहरांमधील कचरा नैसर्गिक नाल्यांमधून समुद्रात टाकला जातो. यामध्ये प्लास्टिकसह विघटन न होणाऱ्या विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश असतो. समुद्र हा कचरा भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्याकडे ढकलतो. किनाऱ्यावर या कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. कोरोना काळात २०२० मध्ये एन्व्हायर्मेंट लाईफ फाउडेशनचे धर्मेश बराई नेरूळमधील टी एस चाणक्यच्या किनाऱ्यावर भटकंतीसाठी गेले असताना तेथील कचरा पाहून व्यथित झाले. स्वत:सह एकूण तीन सहकाऱ्यांनी रविवारी या परिसरात पहिले स्वच्छता अभियान राबविले. या अभियानाची माहिती समाज माध्यमांवर टाकण्यात आली. यानंतर अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ९ असे दोन तास खाडीकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी योगदान देण्याचा निश्चय केला. तेव्हापासून सलग चार वर्षे हे अभियान सुरूच आहे.

या रविवारी सारसोळे जेट्टी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचा हा २०० वा आठवडा होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विविध खाडीकिनारी हे अभियान नियमित राबविले जात आहे. एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनच्या मँग्रोव्हज सोल्जर विभागाच्या माध्यमातून हे अभियान आता राबविले जाते. मँग्रोव्हज फाउंडेशन व नवी मुंबई महानगरपालिकेचेही त्यासाठी योगदान लाभत आहे. शहरातील विविध पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीही खाडीकिनारा स्वच्छ करण्याच्या अभियानात सहभागी होत आहेत. नवी मुंबईसोबत मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यामध्येही ही चळवळ पसरली आहे.

२०० मोहिमेत यांचा सहभाग

सारसोळे जेट्टी परिसरातील २०० व्या अभियानामध्ये वनशक्ती, बीच प्लीज, स्वच्छ वसुंधरा अभियान व मँग्रोव्हज सोल्जरचे स्वयंसेवक व महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, नेरूळचे विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, दिनेश वाघुळदे, एन्हायर्मेंट लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० मी मोहीम पार पडली.

चार वर्षांमध्ये सलग २०० आठवडे हे अभियान राबविण्यात आले आहे. आतापर्यंत चप्पल, थर्माकाॅल, मेडिकल वेस्ट, सौंदर्य प्रसाधनाचा कचरा, खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पेन, लायटर्स अशा एकूण ६०० टन कचरा संकलित केला आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये ५० ते २ हजार नागरिक सहभागी होतात. आतापर्यंत ६० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आहे. धर्मेश बराई, संस्थापक एन्व्हायर्मेंट लाईफ फाउंडेशन

Web Title: 200 cleanup campaign in 4 years on coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.