नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल दोन हजार शिबिरार्थींनी तपासणी करून घेतली. तर २00 जणांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. बोनकोडे श्रमिक शिक्षण मंडळ आणि राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या संयुक्त पुढाकाराने कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयात रविवारी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश नाईक, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ. शिवदास भोसले उपस्थित होते. आमदार संदीप नाईक यांनी शिबिरास भेट दिली. नवी मुंबईत अशा प्रकारचे शिबिर प्रथमच पार पडले. १00पेक्षा अधिक एमडी डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली. आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. तपासण्यांबरोबरच नेफ्रॉलॉजी युरोलॉजी, कार्डिओलॉजी या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका वातानुकूलित मोबाइल व्हॅनमध्ये रक्त चाचण्या, हाडांची ठिसुळता, दंत विकार इत्यादी चाचण्या करण्यात आल्या. तपासणीमधून पुढील उपचारासाठी २00 जणांची निवड करण्यात आली आहे. १00 जणांची टुडी इको चाचणीसाठी निवड करण्यात आली. शिबिरात छातीच्या विकाराचे काही रु ग्ण आढळले. त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याचे आयोजकांनी या वेळी स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. प्रशांत थोरात यांनी उपक्र माचा उद्देश विशद केला.याप्रसंगी रा. फ. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, डॉ. आर. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, पालिकेचे क्रीडा समितीचे सभापती लीलाधर नाईक, नगरसेविका वर्र्षा नाईक, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक देविदास हांडे-पाटील, नगरसेवक निवृत्ती जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केशव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आरोग्य शिबिरात २000 नागरिकांची तपासणी
By admin | Published: April 17, 2017 4:18 AM