अंदमानमधील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे, महाराष्ट्रातील या वीरांना मिळाला सन्मान   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:20 PM2023-01-23T13:20:38+5:302023-01-23T13:21:37+5:30

Andaman & Nicobar Islands: आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे.

21 islands in Andaman named Paramveerachakra winners, this hero from Maharashtra got the honour | अंदमानमधील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे, महाराष्ट्रातील या वीरांना मिळाला सन्मान   

अंदमानमधील २१ बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे, महाराष्ट्रातील या वीरांना मिळाला सन्मान   

googlenewsNext

नवी दिल्ली - आज पराक्रम दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमानमधील २१ बेटांचे परमवीरचक्र विजेत्या वीरांच्या नावांनी नामकरण केले. यामध्ये विक्रम बत्रा, अब्दुल हमीद, रामा राघोबा राणे,  ए.बी. तारापोर यांच्या नावांचा समावेश आहे. आतापर्यंत निवावी असलेली ही बेटे आता या शूरवीरांच्या नावाने ओळखली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाग घेतला. नेताजी यांच्या १२६ व्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे पोर्ट ब्लेअर येथे दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या परमवीरचक्र विजेत्यांची नावे अंदमानमधील बेटांना दिली आहेत त्यांनी विविध युद्धांमध्ये पराक्रमाची शर्थ केलेली आहे. बेटांना नावं देण्यात आलेल्या परमवीरचक्र विजेत्यांमध्ये सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे,  कंपनी हवालदार मेजर पीरू सिंह, कॅप्टन जी.एस. सलारिया, लेफ्टिनंट कर्नल धान सिंह थापा, सुभेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टिनंट अरुण क्षेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मल सिंह शेखों, मेजर परमेश्वरम, नायब सुभेदार बना सिंह, मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन करम सिंह, नायक जदुनाथ सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार, सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांचा समावेश आहे. 

या शूर वीरांपैकी  लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांचं महाराष्ट्राशी खास नातं आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता.  त्यांनी १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पूना हॉर्सच्या तुकडीने पाकिस्तानचे ६० हून अधिक रणगाडे नष्ट केले होते. मात्र पाकिस्तानी सैन्याबरोबरच्या या घनघोर लढाईत तारापोर यांना वीरमरण आले होते. लेफ्टिनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर यांच्या कुटुंबाला शौर्याचा वारसा होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात गाजवलेल्या कामगिरीबद्दल महाराजांनी त्यांच्या पूर्वजांचा विशेष सन्मान केला होता, असे सांगण्यात येते. नंतरच्या काळात त्यांचे पूर्वज हैदराबादमध्ये स्थलांतरित झाले होते.

तर सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांनी १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवला होता. या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात जन्मलेल्या रामा राघोबा राणे यांनी १९५८ पर्यंत लष्करात सेवा दिली. त्यानंतर ते पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून लष्करात सेवा देत राहिले. १९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती स्वीकारली. 

Web Title: 21 islands in Andaman named Paramveerachakra winners, this hero from Maharashtra got the honour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.