पुष्पकनगरमधील २१ भूखंडांचे करारपत्र

By admin | Published: July 10, 2016 04:30 AM2016-07-10T04:30:02+5:302016-07-10T04:30:02+5:30

विमानतळबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर येथे २२.५ टक्के भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या भूखंडांचे वाटपपत्र देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. बुधवारी

21 plots agreement in Pushpak Nagar | पुष्पकनगरमधील २१ भूखंडांचे करारपत्र

पुष्पकनगरमधील २१ भूखंडांचे करारपत्र

Next

नवी मुंबई : विमानतळबाधितांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर येथे २२.५ टक्के भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. या भूखंडांचे वाटपपत्र देण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. बुधवारी २१ भूखंडांचे करारपत्र करण्यात आले. प्रकल्पग्रस्त स्वत:हून पुढे येत असल्याने येत्या काही दिवसांत आणखी काही भूखंडांचे करारपत्र केले जाणार आहे. दरम्यान, या भूखंडांच्या त्रिपक्षीय करारनाम्याला सिडकोने मुभा दिल्याने प्रकल्पग्रस्तांसमोर आपल्या या भूखंडांच्या विक्रीचा मार्गही खुला झाला आहे. याचा परिणाम म्हणून साडेबावीस टक्के योजनेतील भूखंडांच्या खरेदी-विक्रीला गती प्राप्त झाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोने १० गावांतील ६७२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्याबदल्यात येथील प्रकल्पग्रस्तांना नियोजित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात आली आहे. आठ महिन्यांपूर्वी या भूखंडांची संगणकीय सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार लाभधारकांना भूखंडांचे वाटपपत्रे देऊन जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्याची कार्यवाही यापूर्वीच पनवेल येथील मेट्रो सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी त्रिस्तरीय कराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आपल्या भूखंडांची विक्री करता येत नव्हती. परंतु गेल्या महिन्यात सिडकोनेच त्रिपक्षीय करारनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना भूखंडांची विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा परिणाम म्हणून साडेबावीस टक्के भूखंडांच्या किमती आतापासूनच गगनाला भीडल्या आहेत. १00 चौरस मीटरच्या भूखंडाला ४0 ते ६0 लाखांच्या दरम्यान किमत मिळत आहेत.

विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या भूखंडांची विक्री न करता स्वत:च त्याचा विकास करावा, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे भूखंड विकायचेच असतील तर घाई करू नका, काही वर्षे प्रतीक्षा केल्यास या भूखंडांना कोटींचे भाव येतील, असेही सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांना वारंवार सांगण्यात येत आहे. त्यानंतरही ज्यांना आपल्या भूखंडांची विक्री करायची असेल, त्यांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने सिडकोने त्रिपक्षीय कराराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ‘लोकमत’ला दिली.
- सिडकोने १० गावातील ६७२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्याबदल्यात येथील प्रकल्पग्रस्तांना नियोजित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात आली आहे.
-साडेबावीस टक्के भूखंडांच्या किमती आतापासूनच गगनाला भिडल्या आहेत. १00 चौरस मीटरच्या भूखंडाला ४0 ते ६0 लाखांच्या दरम्यान किंमत मिळत आहेत.

Web Title: 21 plots agreement in Pushpak Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.