पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:36 AM2019-10-20T00:36:58+5:302019-10-20T05:26:51+5:30
मतदारसंघात ५७६ मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांची संख्या ९२७
पनवेल : राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या १८८ पनवेलमध्ये ५७६ मतदान केंद्र असून त्यातील २१ केंद्र संवेदनशील आहेत. यात खारघर येथील सात तर पनवेल येथील पाच मतदार केंद्रांचा समावेश आहे.
खारघर येथील डीएव्ही स्कूल, ग्रीन फिंगर शाळा, सुधागड एज्युकेशन शाळा, सुधागड एज्युकेशन, कोपरा समाज हॉल, रेड क्लिप स्कूल खोली क्र. १ खारघर, रेड क्लिप शाळेच्या पार्किंगमध्ये तयार केलेल्या मतदार केंद्राचे खोली क्रमांक ३ तर पनवेल महापालिका हद्दीतील सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, चांगू काना ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल, प्राथमिक मराठी शाळा पोदी, पीर करमअली शहा उर्दू प्राथमिक शाळा पनवेल, याकूब बेग हायस्कूल पनवेल या २१ केंद्राचा संवेदनशील केंद्रात समावेश होतो.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त म्हणजेच ५७६ मतदान केंद्र असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक यंत्रणेसंदर्भात माहिती दिली.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील एकूण २१ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मायक्रोआॅब्जर्व्हरची व्यवस्था केली असून, येथे सीसीटीव्ही लावून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सीपीएफचा बंदोबस्तही या केंद्रावर नेमण्यात येणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. तर २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी व्ही. के. हायस्कूल येथे पार पडणार आहे.
पनवेलमध्ये एकूण ९२७ मतदार दिव्यांग व अंध, मूकबधिर आहेत. यात ३४८ दिव्यांग, १४३ अंध मतदार, ४२ मूकबधिर मतदार व इतर ३९४ असे एकूण ९२७ मतदार आहेत. ५७६ मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच असे तीन हजार कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तर प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे अशा जवळपास ६०० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. व्ही. के. हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट करण्यात येणार आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदार असलेले केंद्र खारघर रेडक्लिप हे आहे. या ठिकाणी १,७५२ मतदार संख्या आहे. तर सर्वात कमी मतदार हे खैरवाडी मतदार केंद्रावर आहेत. या ठिकाणी केवळ ३०५ मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे अवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नवले यांनी केले आहे.
लिफ्ट तसेच दुसºया सुविधांच्या अभावामुळे मतदान केंद्र तळमजल्यावर हलविण्यात आले आहे. मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी २० हजार पॅम्प्लेट वाटप करण्यात आले आहेत. २४ तास हेल्पलाइन सुरू ठेवण्यात आली आहे. २१ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जास्त १०० ईव्हीएम मशिन पनवेल मतदारसंघात उपलब्ध आहेत. दिव्यांग व अपंग मतदारांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून १०० पेक्षाजास्त व्हीलचेअर विविध मतदान केंद्रांवर ठेवण्यात आले आहेत. काही मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले आहेत.