घरांसाठी ५ दिवसांत तब्बल २१ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:23 AM2018-08-20T04:23:36+5:302018-08-20T04:23:53+5:30
सिडकोकडे महिनाभरात लाखो अर्जांची शक्यता
नवी मुंबई : सिडकोच्या घरांसाठी ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसांत जवळपास २१ हजार ग्राहकांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात अर्जाची संख्या लाखांच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वांना घरे योजनेअंतर्गत सिडकोने ५२ हजार घरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १४,८३८ घरांची योजना गेल्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. या घरांसाठी १५ आॅगस्ट दुपारपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्याच दिवशी २२१७ ग्राहकांनी अर्ज भरले होते. रविवारपर्यंत २०,९४८ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ७४११ अर्जदारांनी आॅनलाइन पेमेंटही केले आहे. तर १३,३३० अर्जदारांनी अद्यापि शुल्क भरलेले नाही. अर्ज भरल्यानंतर १६ सप्टेंबरपर्यंत शुल्क भरता येणार आहे, त्यामुळे सध्या अर्ज दाखल करण्यावर ग्राहकांनी भर दिला आहे. हा प्रकल्प उत्पन्न घटक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. मागील काही वर्षांत बजेटमधील छोट्या घरांची निर्मिती बंद झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू होती, त्यामुळे अनेकांना सिडकोच्या गृहप्रकल्पाची प्रतीक्षा होती. सिडकोने प्रथमच केवळ अल्प उत्पन्न आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तब्बल १५ हजार घरांची योजना जाहीर केल्याने ग्राहकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून अवघ्या पाच दिवसांत जवळपास २१ हजार अर्ज दाखल झाले आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.