नवी मुंबईच्या स्वच्छतेसाठी २१ हजार विद्यार्थ्यांचे मतदान
By नामदेव मोरे | Published: July 2, 2024 08:25 PM2024-07-02T20:25:48+5:302024-07-02T20:26:23+5:30
८० शाळांमध्ये मतदान केंद्र : विद्यार्थी दाखविणार स्वच्छतेचा आरसा
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महानगरपालिकेने मंगळवारी ८० शाळांमध्ये स्वच्छता मतदान उपक्रम राबविला. २१ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या मतदानात सहभाग घेतला. ७ प्रश्नांची मतपत्रीका विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे मतपेटीत बंद झाली असून बुधवारी त्यांचा निकाल प्रपत्रामध्ये भरून पुढील कार्यवाहीसाठी घनकचरा विभागाकडे पाठविला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. कचरा वर्गीकरण, नालेसफाई, सार्वजनीक शौचालयांची नियमीत स्वच्छता, सुशोभीकरणासह सर्व उपक्रम सर्व नागरिकांपर्यंत पोहचले आहेत का याकडेही लक्ष दिले जात आहे. स्वच्छता अभियानामध्ये विद्यार्थीही स्वच्छता दूत म्हणून योगदान देत आहे. पालिकेच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे का हे समजून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मतदान उपक्रम राबविला. मंगळवारी महानगरपालिकेच्या ८० शाळांमध्ये ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या मतदानात सहभाग घेतला. प्रत्येक शाळेत मतदान केंद्र तयार केले होते. विद्यार्थ्यांना ७ प्रश्नांची मतपत्रीका दिली होती. त्यामध्ये हो व नाही स्वरूपात उत्तरे भरणे अपेक्षीत होते. २१ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मतदान करून शहर स्वच्छतेचा आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी सर्व शाळांमधील मतपत्रीका संकलीत केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची माहिती प्रपत्रामध्ये भरण्यात येणार आहे. शाळानिहाय अहवाल तयार करून तो घनकचरा व्यवस्थापन विभागास देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छता अभियानाच्या कामामध्ये सुधारणा करणेही यामुळे शक्य होणार आहे.
मतपत्रीकेमधील प्रश्न पुढील प्रमाणे
तुमच्या घरातील कचरा घेवून जाण्यासाठी रोज घंटागाडी येते का.
तुमच्या घरातील कचरा ओला व सुका असा वेगळा जमा करता काय.
तुमच्या घराशेजारी असलेले नाले स्वच्छ आहेत का.
शहरातील थ्री आर सेंटरविषयी तुम्हाला माहिती आहे का.
शहरातील सार्वजनीक शौचालयांचा वापर केला आहे का.
शहरातील सार्वजनीक शौचालये स्वच्छ आहेत का.
डिजीटल नकाशावर सार्वजनीक शौचालये शोधता येऊ शकते का.
तुम्ही तुमच्या परिसराच्या स्वच्छतेचे मुल्यांकण कसे कराल, तुम्ही शहराच्या एकूण स्वच्छतेला किती गुण द्याल.
अशी होती रचना
मतदान केंद्रावर१ मतदान केंद्र अध्यक्ष, मतदाराचे नाव पुकारणारा १ मतदान अधिकारी, शाई लावून देणारे २ मतदान अधिकारी, मतदारांच्या नावाची नोंद करणारे ३ अधिकारीअशी रचना केली होती. मतदान झाल्यानंतर मतपेट्या सील करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना लोकशाहीची प्रक्रिया समजण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता विषयी जनजागृती होण्यासाठी हा उकप्रम उपयोगी ठरला आहे. मतदानातून व्यक्त झालेल्या मतांचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे दिला जाणार आहे. - संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त शिक्षण मंडळ