पनवेलमधील २२ इमारती धोकादायक; इमारती रिकामी करण्यासाठी सोसायटींना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:54 AM2018-08-02T04:54:26+5:302018-08-02T04:54:44+5:30
- मयूर तांबडे
पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा इमारतींना पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने या २२ सोसायट्यांना इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सुकापूर गावात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागलेली आहे. २0११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४ हजार ९९0 आहे, तर सद्यस्थितीत लोकसंख्या ३५ हजारपेक्षा जास्त आहे. नवीन पनवेल शहरालाच सुकापूर गाव लागून असल्याने मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढू लागली आहे. ग्रामपंचायत हद्दीत २७२ सोसायट्या आहेत. त्यामुळे मोठमोठ्या इमारती सुकापूरमध्ये उभ्या राहिल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अशा प्रकारच्या धोकादायक इमारती पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते.
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने धोकादायक इमारतीत वास्तव्य करणे जीवावर बेतू शकते. पावसाळ्यामध्ये संभाव्य अतिवृष्टी, वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतींमध्ये कोणीही वास्तव्य करू नये अशा नोटिसा ग्रामपंचायतीमार्फत सोसायटीधारकांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य केल्यास कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या गृहनिर्माण सोसायटीने सर्व सदस्यांसह इमारत खाली करून इमारतीचे
स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यास सांगितले आहे.
जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखा परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. लेखा परीक्षणामध्ये ज्या इमारती दुरुस्ती करून त्यांचा वापर करणे शक्य असेल त्यांची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ज्या इमारती अतिधोकादायक आहेत त्या सुरक्षिततेसाठी खाली करणे आवश्यक आहे.
काय आहे नोटीसमध्ये?
पालीदेवद ग्रामपंचायत हद्दीतील आपण राहत असलेली इमारत धोकादायक असल्याने ग्रामपंचायतीच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरील इमारत कोणत्याहीक्षणी पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या पावसाळा सुरू असल्याने अशा प्रकारच्या धोकादायक इमारती पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण राहत असलेली इमारत धोकादायक असल्याने अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास आपल्या इमारतीत राहणाऱ्या तसेच शेजारील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो.
आपण आपल्या गृहनिर्माण सोसायटीतील सर्व सदस्यांसह सदरील इमारत खाली करून सदर इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे व त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. अशाप्रकारचा मजकूर नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे.
नोटीस दिलेल्या इमारती
शांतीनिकेतन गृहनिर्माण सोसायटी
त्रिदेव गृहनिर्माण सोसायटी
साई सागर गृहनिर्माण सोसायटी
शिवसागर गृहनिर्माण सोसायटी
ज्योती गृहनिर्माण सोसायटी
स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटी
सिद्धी गृहनिर्माण सोसायटी
फिनिक्स गृहनिर्माण सोसायटी
श्री सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटी
अवंतिका गृहनिर्माण सोसायटी
निर्मळ गृहनिर्माण सोसायटी
स्नेहकुंज गृहनिर्माण सोसायटी
प्रेरणा गृहनिर्माण सोसायटी
श्री गणेश गृहनिर्माण सोसायटी
चेतना गृहनिर्माण सोसायटी
श्रीनिवास गृहनिर्माण सोसायटी
नवजीवन गृहनिर्माण सोसायटी
आकाश दीप गृहनिर्माण सोसायटी
स्नेह सागर गृहनिर्माण सोसायटी
शांती सागर गृहनिर्माण सोसायटी
प्रभात गृहनिर्माण सोसायटी
साईनाथ गृहनिर्माण सोसायटी
२२ इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठीच्या ठरावाला ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली आहे. तरी इमारतीतील रहिवाशांनी या इमारती लवकरात लवकर खाली कराव्यात व स्ट्रक्चरल आॅडिट करून घ्यावे. २२ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च ग्रामपंचायत करेल.
- नंंदकिशोर भगत,
ग्रामसेवक,
पाली देवद ग्रामपंचायत