२३ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:10 AM2018-08-08T03:10:24+5:302018-08-08T03:10:28+5:30

रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे.

23 lakhs of ganja seized | २३ लाखांचा गांजा जप्त

२३ लाखांचा गांजा जप्त

googlenewsNext

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. नाकाबंदीसाठी कार अडवली असता चालकाने कार सोडून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये १५८ किलो गांजा आढळून आला.
घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजमहेंद्र बाळतकर, सहायक निरीक्षक राहुल सोनवणे, नितीन पगार, तुकाराम निंबाळकर यांचे पथक तयार करण्यात आलेले. त्यानुसार सेक्टर ५ व इतर परिसरात सोमवारी पहाटे नाकाबंदी लावण्यात आलेली. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची चौकशी केली जात होती. याचदरम्यान सदर मार्गाने एक स्कोडा कार (एमएच ४३ ए १८२५) त्याठिकाणी आली. परंतु पोलिसांना पाहताच कारमधील व्यक्तींनी कार जागीच सोडून अंधारात पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून देखील ते हाती लागले नाहीत. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी ते सोडून गेलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह हा गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, तो १५८ किलो होता. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी सांगितले. परंतु कार मालक तसेच गांजा घेवून त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. तर या प्रकारावरून रात्रीच्या वेळी महागड्या गाड्यांमधून त्याची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. हा गांजा झोपड्यांमध्ये अथवा नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत विक्री केला जात असल्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमधून ही बाब समोर आलेली आहे. परंतु सातत्याने कारवाया करून देखील गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नसल्याने शहरातली तरुणाई नशेच्या आहारी जात चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर या गांजाची विक्री होत आहे. तर एपीएमसी, तुर्भेसह अनेक ठिकाणी गांजाची शेती यापूर्वी आढळलेली आहे. परंतु गांजा पुरवणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नाहीयेत.

Web Title: 23 lakhs of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.