लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या २३० आशासेविकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू करण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत विमा कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, योजना राबविण्याची कार्यवाही करण्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला सूचित करण्यात आले आहे.
आशासेविकांना विमा कवच देण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी वयाची मर्यादा १८ ते ५० असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तिंचा कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी दरवर्षी ३३० रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या पॉलिसीधारकाचे वय १८ ते ७० वर्षापर्यंत असावे लागेल. या योजनेसाठी १२ रुपये वार्षिक भरावे लागणार असून, अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास २ लाख रुपये तसेच अपघातामुळे अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळणार आहेत.
७७ हजार भरणारनागरी आरोग्य केंद्रांमध्ये २३० आशासेविकांच्या विम्याचे हप्ते पालिकेने भरावेत, असे सूचित केले आहे. त्यानुसार सर्व आशासेविकांच्या विम्याच्या हप्त्यापोटी पालिका सुमारे ७७ हजार रुपये दरवर्षी भरणार आहे.