नवी मुंबई : सिडकोच्या खारघर, नेरूळ आणि खारकोपर भागातील तीन प्रकल्पांत २३५४ डौलदार झाडे बाधित होणार आहेत. सिडकोच्या वृक्ष अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार १६१० झाडांची कायमची कत्तल आणि ७४४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मान्यता दिली आहे. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या पाचव्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पात खारकोपर येथे पंतप्रधान आवास योजनेची घरे, खारघर ते नेरूळ जलमार्ग आणि खारघर ते विक्रोळीपर्यंतच्या वीजवाहिन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने सिडकोस मोठा दिलासा मिळाला असून, या तिन्ही प्रकल्पांची कामांना आता लवकरच सुरुवात करणे सोपे होणार आहे.
कोणत्या प्रकल्पात किती झाडांचा जाणार बळी
१ - सिडको खारकोपर सेक्टर १६ येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २२,९७३ घरे बांधत आहे. या घरांच्या बांधकाम ज्या भूखंडांवर करण्यात येत आहे, त्याठिकाणी दोन पुरातन दुर्मीळ बांबूंच्या वृक्षांसह एकूण २३३ झाडे बाधित होत आहेत. यापैकी ९६ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार असून, १३७ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे.
२ -खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या ९.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टलच्या रोडच्या बांधकामात ४४७ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ३०९ वृक्षांची कायमची कत्तल करावी लागणार आहे. तर १३८ झाडांचे पुनर्राेपण करू, असा प्रस्ताव सिडकोने राज्य वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला होता.
३ : मुंबईतील वीजटंचाई कमी करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या खारघर ते विक्रोळीदरम्यानच्या ४०० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव आहे. या वीजवाहिन्यांच्या मार्गात १६७४ डौलदार वृक्ष बाधित होणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक १२०५ झाडांची कत्तल करण्यात येणार असून, ४६९ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.भरपाई म्हणून २८१६० झाडांची नव्याने लागवड
तीन प्रकल्पात होणाऱ्या या वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या बदल्यात सिडकोस २८१६० झाडांची भरपाई म्हणून नव्याने लागवड करण्यास सांगण्यात आले. या सर्व बाधित झाडांचे आयुष्यमान २८१६० वर्षे असल्याने तेवढी झाडे अन्यत्र लावावीत, लागवड करण्यात येणाऱ्या रोपांची उंची ६ फुटांपेक्षा कमी नसावी आणि कत्तल झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सुयोग्य ठिकाणी करावी, अशा अटी राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने घातल्या आहेत.