नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे- भाजप यांचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने वेग पकडला आहे. यानुसार बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणारी मुंबई आणि पालघरमधील २,३६८ झाडे तोडण्यास आणि ४२५ झाडांचे पुनर्रोपण करण्यास राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील नऊ हेरिटेज वृक्षांसह १,३६८ वृक्ष तोडण्यास सहाव्या बैठकीत मंजुरी दिलेली होती. त्यांचे सरासरी आयुष्यमान १४,५८६ वर्षे आहे.
आता पुन्हा मुंबईच्या विक्रोळी येथील १,६८७ झाडांची तोड करण्यास आणि १४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या वृक्षांचे सरासरी आयुष्यमान ५,३१७ वर्षे आहे, तर यापूर्वी सहाव्या बैठकीत हा प्रस्ताव परत पाठविलेला पालघरमधील ६८१ झाडांच्या कत्तलीचा प्रस्ताव आठव्या बैठकीत मंजूर केला आहे. यात पालघरच्या मोरीवली, वेवूर, नावाळी आणि घोलविरा गावाच्या हद्दीतील ज्या ६८१ झाडांची कत्तल आणि ३८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन आणि पालघर नगर परिषदेने वृत्तपत्रात यासंबंधीची जाहिरात न देताच सहाव्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला होता. त्यामुळे तेव्हा तो वृक्ष प्राधिकरण समितीने परत पाठवून वृत्तपत्रात जनतेच्या माहितीसाठी जाहिरात देऊन आणण्यास सांगितले होते. ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आता आठव्या बैठकीत त्यास मान्यता देेण्यात आली आहे.
पहिलाच प्रकल्प पुण्यात मुळा-मुठाच्या विकासात ७,४९६ वृक्ष बाधितपुण्याच्या मुळा-मुठा रिव्हर फ्रंटसाठी ३,०६७ झाडांची कत्तल आणि ४,४२९ झाडांचे पुनर्राेपण करण्यात येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होणारा अलीकडच्या काळातील हा पुण्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत आहे.
२६२ झाडांची कुर्ला येथे कत्तल गेल्या आठवड्यात राज्याच्या महसूल आणि वन विभागाने ठाणे आणि पालघरमधील ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनला सुपुर्द केली आहे. याशिवाय याच बैठकीत मुंबईतील भांडूप येथील मुंबई महापालिकेच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १४४ झाडांची तोड करण्याची आणि ३०४ झाडांचे पुनर्रोपण, तसेच मेट्रोच्या मार्ग क्रमांक २ बीसाठी कुर्ला येथे २६२ झाडांची कत्तल आणि ५३० झाडांच्या पुनर्रोपणासही मंजुरी देण्यात आली आहे.