२४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त; पाच संशयित अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:13 AM2023-05-15T09:13:31+5:302023-05-15T09:14:30+5:30
या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मधुकर ठाकूर -
उरण : न्हावा- शेवा सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई-सिगारेटचा साठा जप्त करण्याची घटना ताजी असतानाच शुल्क विभागाच्या मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेला २४ कोटींचा विदेशी सिगारेटचा साठा रविवारी (१४) जप्त केला. जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअर हाऊसमध्ये ४० फुटी कंटेनरमधून एक कोटी २० लाख प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा आढळला आहे. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर तस्करीच्या मार्गाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरातून निर्यात करण्यात आल्याची माहिती मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा रचण्यात आला.
विदेशातून तस्करी
कंटनेरमध्ये प्रतिबंध असलेल्या व विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठविण्यात आलेल्या उडन गरम, डनहिल,बेन्सन ॲड हेजेस, ईसी लाईट, मोड आदी प्रकारांतील एक कोटी २० लाख सिगारेटचा साठा आढळला.
तीन कोटींच्या इ सिगारेट
दोन दिवसांपूर्वीच न्हावा- शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटींच्या ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे. विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाण्याची बाटली, चुंबकीय बटण, बेल्ट बकलच्या बनावट नावाखाली ४० फुटी कंटेनरमधून पाठविण्यात आलेला ४५,८८६ ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
४० फुटी कंटेनर संशयाच्या फेऱ्यात
कसून केलेल्या तपासात जेएनपीए परिसरातील आर्शिया वेअरहाऊसमधील एक ४० फुटी कंटेनर संशयाच्या फेऱ्यात अडकला. तपासणीत २४ कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला असून पाच संशयितांनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.