एका आठवड्यात चोवीस कोटी वसूल, महापालिकेची ‘अभय योजना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:40 AM2020-12-24T00:40:26+5:302020-12-24T00:40:43+5:30
Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही.
नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने ‘अभय योजना’ सुरू केली आहे. एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये थकबाकी जमा झाली आहे. मोठ्या थकबाकीदारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जास्तीतजास्त मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून अभय योजनेच्या कालावधीतही कर भरणा न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कराचा वाटा महत्त्वाचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कर वसुली समाधानकारक होत नाही. थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना कर भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. अभय योजनेच्या काळात कर भरणा करणारांना दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरावा लागणार आहे. १ एप्रिल ते २१ डिसेंबरदरम्यान १८७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. अभय योजना सुरू केल्यापासून एक आठवड्यात २४ कोटी १८ लक्ष रुपये कर वसुली झाली आहे.
आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कर भरणे ही प्रत्येक मालमत्ताकरधारकाची जबाबदारी आहे. थकबाकीदारांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनेक मोठे थकबाकीदार कर भरणा करीत नाहीत. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे. त्यांच्यावर कारवाई करून कर वसूल करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
अभय योजना सुरू केल्यापासून नेरूळ एमआयडीसीमधील जी. एस. सेठी अँड सन्स यांनी ४८ लाख ६६ हजार २७९ रुपये कर भरणा केला आहे. नेरूळ सेक्टर ३८ मधील स्टोन लाईफस्पेस यांनी ३० लाख ३५ हजार ६५० रुपये कर भरणा केला आहे. जास्तीतजास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
मालमत्ता जप्त करणार
अभय योजना काळात जे थकबाकीदार कर भरणा करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात येणार आहेत. मालमत्ता जप्त करणे व इतर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येकानी कर भरणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर कर भरावा.