उरण : जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे घारापुरी बेटाला आता सुरक्षा यंत्रणेचा २४ तास पहारा राहणार आहे.घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही विशेष उपाययोजना नव्हत्या. याशिवाय त्यांना आवश्यक सुविधांही मिळत नाहीत. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संबंधित विविध शासकीय विभागांचे नेहमीच दुर्लक्षच होत आहे, त्यामुळे पर्यकांना भेडसाविणाºया विविध समस्यांवर सोडविण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने शुक्र वारी विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावरील पुरातन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव, इंटेलिजन ब्युरो विभागाचे सहायक संचालक दीपक ग्रोव्हर, न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर. सी. यादव, मोरा पोलीस ठाण्याचे वपोनि माणिक नलावडे, आयबीचे निरीक्षक एस. चॅटर्जी, मेरीटाइम बोर्ड मोरा विभागाचे निरीक्षक नितीन कोळी, निरीक्षक पी. बी. पवार, पुरातन विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आदीसह बेटावरील व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.घारापुरी बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथून पर्यटक घेऊन प्रवासी बोटी घारापुरी बेटावर येतात. बोटीतून घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र, पर्यटक माघारी मुंबईकडे जाताना त्यांची मोजदाद होत नाही, त्यामुळे बºयाच वेळा शेवटची प्रवासी बोट निघून गेल्यानंतरही काही पर्यटक बेटावरच अडकून पडतात. शेवटची बोट सुटल्यानंतर मुंबईला पोहोचण्यासाठी बोटीची कोणतीही सुविधा नसल्याने बेटावर अडकलेल्या पर्यटकांना राहण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अडकलेला पर्यटकांची माहिती नसल्याने गावातील स्थानिक ही त्यांना मदत करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना जंगलातच रात्र काढावी लागते.वनखात्याकडेही जंगलात गस्तीसाठी कर्मचारी नाहीत, त्याशिवाय छोट्या-मोठ्या बोटीतून वाशी, न्हावा, उरण, मोरा येथून राजबंदर जेट्टीवरून लेण्या पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांची कुठेही नोंद नसते. अशा सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यावरील दुर्लक्षपणामुळे घारापुरी बेटाला निश्चितपणे घातपाताचा धोका संभवतो. त्याशिवाय अतिरेकी कारवायांचाही धोका संभवत असल्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.चर्चेअंती घारापुरी बेटाच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षा आणि टेहळणीसाठी बेटावरील डोंगरावर पोलीस चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी २४ तास ठाणे अंमलदारासह पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरु स्ती, पाणपोई आणि शौचालयांची तत्काळ उभारणी आवश्यक आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घारापुरी बेट आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी आणि बैठकीत झालेल्या चर्चेचा व निर्णयाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एलिफंटा बेटावर २४ तास पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:52 PM