कोरोना रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी 24 तास सतर्क राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:32 AM2021-04-22T00:32:08+5:302021-04-22T00:32:18+5:30

नाशिकच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पालिकेची खबरदारी : आवश्यकतेपेक्षा तीन पट ऑक्सिजनचा साठा करण्याचे निर्देश

24 hour vigil for the safety of Corona Hospitals | कोरोना रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी 24 तास सतर्क राहा

कोरोना रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी 24 तास सतर्क राहा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना रुग्णालयांमधील सुविधा व सुरक्षेसाठी २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश सर्व रुग्णालयांना दिले आहेत. इलेक्ट्रीक व रुग्णालयीन उपकरणांची देखभाल नियमित करण्यात यावी. ऑक्सिजनचा साठ्याचा नियमित आढावा घेण्यात यावा. खासगी रुग्णालयांनी ३ पट अधिक साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईमधील रुग्णालयांची सुरक्षा व ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुख्यालयात तातडीने बैठक घेतली होती. नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना नवी मुंबई परिसरात होऊ नये, यासाठी मनपा व खासगी कोरोना उपचार केंद्राच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेच्यावतीने सिडको प्रदर्शन केंद्र, राधास्वामी सत्संग भवन व एपीएमसीचे निर्यात भवन येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तेथे ड्युरा सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जातो. तेथील संपूर्ण प्रक्रियेची माहिती आयुक्तांनी घेतली. या तिन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणेमध्ये व सुरक्षा साधनांमध्ये त्वरित वाढ करण्याचे निर्देश दिले.


सद्यस्थितीत पालिकेकडे १०० ड्युरा सिलिंडर असून, ५० ड्युरा सिलिंडरची वाढ करण्यात येणार आहे. पालिकेच्यावतीने सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ७५ आयसीयू बेड्स व ३० व्हेंटिलेटर्सची रुग्णालयीन सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. तेथे आवश्यक असलेली  ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन या वाढीव्यतिरिक्त ड्युरा सिलिंडरमध्ये आणखी वाढ करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. साठवणूक केलेल्या सिलिंडरमध्ये असणारा लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन हा दिवसागणिक कमी होत असतो. त्यामुळे सिलिंडरची साठवणूक करताना वेळेचे योग्य नियोजन करावे व सिलिंडरच्या कालावधीकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. सिलिंडर जरा अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर अतिथंड पाणी पडत राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी चिलींग सिस्टम बसवावी, असेही सूचित केले.


ऑक्सिजन बेड्स तसेच आयसीयू सुविधा असणाऱ्या सर्व खासगी कोविड रुग्णालयांनी आपली बेड्सची क्षमता विचारात घेऊन उपाययोजना करावी. आवश्यक ऑक्सिजन साठ्याच्या ३ पट अधिकचा साठा उपलब्ध करून ठेवावा. त्या अनुषंगाने आवश्यक सुरक्षा बाळगणेबाबत रुग्णालयांना पत्राद्वारे सूचित करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले. आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, आरोग्य अधिकारी धन्वंतरी घाडगे, ऑक्सिजन पुरवठा व नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

सर्व तांत्रिक टीमला इशारा
कोरोना रुग्णालयातील विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन व इतर तांत्रिक सुविधा पुरविणाऱ्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन यंत्रणाही बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑक्सिजन नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा
महानगरपालिकेने ऑक्सिजनचा साठा व पुरवठा याविषयी आढावा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित केली आहे. डॉ. बाबासाहेब राजळे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहे. मनपाच्या रुग्णालयांना वेळेत पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडला तरी मनपाकडून पुरविला जात असून, नंतर त्यांच्याकडून परत घेतला जात आहे.


कोरोना रुग्णांवरील उपचार व रुग्णालयांची सुरक्षा याविषयी २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणांची नियमित देखभाल करण्यात यावी. ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे निर्देश दिले असून, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
- अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका

Web Title: 24 hour vigil for the safety of Corona Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.