एमपीएससीत २४ पोलिसांना यश
By Admin | Published: May 8, 2017 06:24 AM2017-05-08T06:24:58+5:302017-05-08T06:24:58+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत नवी मुंबईच्या २४ पोलिसांनी घवघवीत यश मिळवले आहे. पोलीस हवालदार
सूर्यकांत वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत नवी मुंबईच्या २४ पोलिसांनी घवघवीत यश मिळवले आहे. पोलीस हवालदार, पोलीस नाईक पदावरील या कर्मचऱ्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
एमपीएसी मार्फत नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. याकरिता त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण व पोलीस दलात ५ ते ६ वर्षांचा कार्यकाळ आवश्यक असतो. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १००हून अधिकांनी एमपीएससीच्या परीक्षेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यापैकी २४ जणांनी लेखी व मैदानी परीक्षेत चांगले गुण मिळवून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळणार असून प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. त्यामध्ये स्वप्निल बेलोसे, निवृत्ती शिंदे, नितीन सांगळे, देविदास डमाळे, मनोज महाडिक, संदीप पारखे, समीर बगाडे, मनीष बच्छाव, प्रवीण जगताप, प्रशांत चव्हाण, मनीष साबळे, किशोर नेवसे, नीलेशकुमार जगताप, सचिन देसाई, हर्षद जुईकर, प्रकाश बोडरे, संदीप वांगडे, आबा कटपाळे, नागेश क्षीरसागर, सुनील होळकर, किरण पाटील, सचिन वायकर, मनोज लोहारे व मंगेश बाचकर यांचा समावेश आहे. त्यापैकी सात जण आरबीआयच्या सुरक्षेचे, तिघे वाहतूक शाखेचे, तिघे मुख्यालयाचे आहेत.
वरिष्ठांची उदासीनता
एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा त्या ठिकाणचे आयुक्त अथवा अधीक्षक यांच्यामार्फत सत्कार सुरु आहे.
२४ कर्मचारी एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही आयुक्त, उपआयुक्त यांच्याकडून अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. याची खंत अत्यंत परिश्रमाने पोलीस उपनिरीक्षक बनलेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.