दिघा येथे २४६८ कोटींची आयटी टाउनशिप, डाटा सेंटर

By नारायण जाधव | Published: May 13, 2023 07:44 PM2023-05-13T19:44:28+5:302023-05-13T19:45:19+5:30

४१ हजार रोजगार : गिगाप्लेक्सच्या पार्कचा विस्तार

2468 Crores IT Township Data Center at Digha new job opening | दिघा येथे २४६८ कोटींची आयटी टाउनशिप, डाटा सेंटर

दिघा येथे २४६८ कोटींची आयटी टाउनशिप, डाटा सेंटर

googlenewsNext

नवी मुंबई : रहेजा उद्योग समूह आपल्या नवी मुंबईतील ऐरोली नॉलेज पार्कमधील दिघा येथील गिगाप्लेक्स आयटी टाउनशिप, डाटा सेंटरचा विस्तार करणार असून सध्या याबाबतचा प्रस्ताव परिवेश समितीकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. या आयटी पार्क, डाटा सेंटरसाठी २४६८ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित केली असून येथे ४१ हजार इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याचे रहेजा समूहाने आपल्या अर्जात म्हटले आहे.

१२० मीटर उंचीच्या २० इमारती
विस्तारित आयटी पार्क २० हेक्टर जागेत बांधण्यात येणार असून येथे १२० मीटर उंचीच्या २० इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यात सुमारे ६२७ निवासी फ्लॅट असणार आहेत. तर २८२५७९ चौरस मीटर क्षेत्रावर वाणिज्यिक आणि ४८१०१.९ चौरस मीटर क्षेत्रावर डाटासेंटर बांधण्यात येणार आहे. यासर्व इमारतींचे बांधकाम क्षेत्र ८,७८,८९१.९९ चौरस मीटर इतके विस्तीर्ण असणार आहे.

एमआयडीसी देणार पाणी
२७५० किलोलिटर पाणी लागणार आहे. त्यापैकी २४५० किलोलिटर सांडपाणी निर्माण होणार आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपनी २९५० किलोलिटर क्षमतेचा एसटीपी प्लाॅन्ट बांधणार आहे. आयटीपार्क आणि डाटा सेंटरसाठी लागणारे पाणी देण्यास एमआयडीसीने आधीच मंजुरी दिली आहे.

दररोज निर्माण होणार १४५१५ किलो कचरा
प्रस्ताविक आयटी टाउनशिप, डाटा सेंटरमधून दररोज १४५१५ किलो कचरा निर्माण होणार असून त्यात ६५८५ किलो जैविक तर ७९३० किलो अजैविक कचरा असणार आहे.

विस्तीर्ण पार्किंगची सोय
प्रस्तावित आयटी टाउनशिप, डाटा सेंटरमध्ये पार्किंगसाठी मोठी सोय केली आहे. यात ६४५ दुचाकींसाठी तर ७१७४ चारचाकींची सोय राहणार आहे.

महावितरण भागविणार विजेची गरज
या आयटीपार्क टाउनशिप, डाटासेंटरसाठी एकूण मोठ्याप्रमाणात विजेची गरज भासणार आहे. यात निवासी वापरासाठी ५.१ मेगावॅट तर वाणिज्यिक वापरासाठी १४२.७१ मेगावॅट वीज लागणार आहे.

राष्ट्रीय उद्यान, फ्लेमिंगो अभयारण्याचा अडथळा नाही
या आयटीपार्क टाउनशिप, डाटासेंटर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सहा किमी तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य तीन किमी लांब आहे. यामुळे त्यांचा अडथळा येणार नाही, असे प्रस्तावात म्हटले आहे.

दळणवळणाच्या मुबलक सोयी
टीटीसी वसाहतीत रिलायन्स समूहाचा मोठा विस्तार आहे. जिओचा सर्व कारभार येथूनच चालतो. मुबलक पाणी, रस्ते, रेल्वेचे जाळे आहे. मुंबई, ठाणे, पनवेल-उरण आणि कल्याण-डोंबिवली महानगरांना लागूनच ही वसाहत आहे. मुंबई विमानतळासह येथून जेएनपीटी बंदरासह नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळच आहे. ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा सायन-पनवेल महामार्ग येथूनच जातो. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाचे नियोजित दिघा रेल्वे स्थानक लवकरच सुरू होणार आहे.

Web Title: 2468 Crores IT Township Data Center at Digha new job opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.