आयटीआयच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटींचा निधी, पुनर्विकास समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 02:28 AM2017-10-13T02:28:56+5:302017-10-13T02:29:07+5:30

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देत असल्याची ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे महाराष्ट्र राज्य संचालक अनिल जाधव यांनी संघर्ष समितीसोबत गुरुवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली

 25 crore fund for redevelopment of ITI, redevelopment committee formed | आयटीआयच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटींचा निधी, पुनर्विकास समिती गठीत

आयटीआयच्या पुनर्बांधणीसाठी २५ कोटींचा निधी, पुनर्विकास समिती गठीत

Next

पनवेल : पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देत असल्याची ग्वाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे महाराष्ट्र राज्य संचालक अनिल जाधव यांनी संघर्ष समितीसोबत गुरुवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिली, तसेच आयटीआय पुनर्विकास संयुक्त समिती गठीत करण्यात आली.
पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरवस्थेबाबत संघर्ष समिती गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्तरावर पाठपुरावा करीत आहे. संघर्षच्या विनंतीनुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे राज्य संचालक अनिल जाधव यांनी आज पनवेल आयटीआयमध्ये विशेष बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार दीपक आकडे, प्राचार्य बी. बी. फडतरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आर. एस. मोरे, उपप्राचार्य एम. बी. पिल्ले, एम. बी. शिंदे, एस. जे. पाटील, बांधकाम खात्याचे विभागीय अभियंता एस. एस. डांगे तर संघर्षच्यावतीने अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, माधुरी गोसावी तसेच पराग बालड, उज्ज्वल पाटील, अ‍ॅड. किरण घरत, भारती जळगावकर, किरण तळेकर, मंगल भारवाड, चंद्रकांत शिर्के, रमेश फुलोरे, आनंद पाटील, शैलेश चौधरी, अमित चावळे, मनोहर देसाई, सुहास अनबोलकर, शैलेश पटेल आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते. संस्थेच्या सर्व इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्यासाठी राज्य शासनाच्या नियमांनुसार व्हिजेंटिया एजन्सीला कळविले आहे. त्यांची ‘फी’ असणारी साडेनऊ लाख रुपयांची रोकड त्यांना आजच अदा करण्यात यावी, असा अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा कांतीलाल कडू यांनी बैठकीत उचलून धरताच, संचालक जाधव यांनी तत्काळ मान्यता देवून ती रक्कम वळती करण्याचे आदेश प्राचार्य फडतरे यांना दिले आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याने आयटीआयच्या इमारतींच्या दुरुस्तीचा सुमारे दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. तो नाकारत संघर्ष समितीने सर्व इमारती नव्याने उभारण्यात याव्यात, अशी मागणी उचलून धरली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. अखेर संचालक जाधव यांनी अत्याधुनिक इमारत उभारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. तहसीलदार दीपक आकडे यांनीही दूरदृष्टिकोन ठेवून पनवेलच्या वैभवात भर घालणारी इमारत उभारली जावी, असे मत व्यक्त केले. तसा प्रस्ताव आर. एस. मोरे यांनी येत्या पंधरा दिवसांत सादर करावा, असे ठरले. त्याला मोरे यांनी सहमती दर्शविली.

Web Title:  25 crore fund for redevelopment of ITI, redevelopment committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.