अपघातांवर अंडरपासचा उतारा! २५ कोटींत बांधणार पाम बीचवर भुयारी मार्ग

By नारायण जाधव | Published: November 9, 2022 06:57 PM2022-11-09T18:57:18+5:302022-11-09T18:57:30+5:30

पाम बीच मार्गाच्या देखण्या रचनेमुळे त्यावरून जाताना सुसाट वाहन चालविण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही.

25 crore to build subway on Palm Beach due to accidents at Navi Mumbai | अपघातांवर अंडरपासचा उतारा! २५ कोटींत बांधणार पाम बीचवर भुयारी मार्ग

अपघातांवर अंडरपासचा उतारा! २५ कोटींत बांधणार पाम बीचवर भुयारी मार्ग

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पाम बीच मार्ग हा गेल्या काही दिवसांपासून अपघात मार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील अपघातांची वाढती संख्या पाहता त्यांना आवर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सानपाडा येथे हलक्या वाहनांसाठी अंडरपास बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा मार्ग पर्यावरण समाघात निर्धारण प्राधिकरणाच्या परवानगीसाठी अडला असून, ती मिळताच लवकरच त्याचे काम सुरू केले जाणार आहे. या कामावर २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पाम बीच मार्गाच्या देखण्या रचनेमुळे त्यावरून जाताना सुसाट वाहन चालविण्याचा मोह वाहनचालकांना आवरत नाही. मात्र, हा मोह अनेदा अपघाताच्या खाईत घेऊन जातो. हे अपघात रोखण्यासाठी सिग्नलची संख्या वाढविणे, रंबलर्स बसविणे, स्पीड रोधक कॅमेरे बसविणे असे उपाय नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलिसांनी अवलंबविले. तसेच गेल्याच महिन्यात वेगमर्यादेवर बंधन घालून ती ताशी ६० वर आणली. परंतु, तरीही वाहने सुसाट धावतच आहेत.

असा असेल अंडरपास
अपघातांना आळा घालण्यासाठी सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ आरसीसी बॉक्स टाईप अंडरपास बांधण्यात येणार आहे. हा अंडरपास एकूण ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधण्यात येणार आहे. त्याची उंची साडेचार मीटर तर रुंदी साडेनऊ मीटरची राहणार आहे. तसेच ५०० मीटरचा ॲप्रोच रोड बांधून पाम बीचवरून सानपाड्यात प्रवेश करता येणे सोपे होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळाल्याचे शहर अभियंता संजय देसाई म्हणाले.

ही काळजी घ्यावी लागणार
सीआरझेडने उच्च न्यायालयाच्या परवानगीसह मँग्रोव्ह सेलचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे. शिवाय हा परिसर फ्लेमिंगाे झोन असल्याने त्याचा या पक्ष्यांच्या अधिवासासह परिसरातील वनसंपत्तीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यास महापालिकेस सांगितले आहे.

सध्या हा मार्ग पर्यावरण समाघात निर्धारण प्राधिकरणाच्या परवानगीसाठी अडला आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि शहराचे रहिवासी विजय नाहटा हेच या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. यामुळे लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी व्यक्त केला. ती मिळाल्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 25 crore to build subway on Palm Beach due to accidents at Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.