ऐरोलीतून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:23 PM2018-10-21T23:23:41+5:302018-10-21T23:23:42+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे रबाळे पोलिसांनी सापळा रचून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त केले आहे.
नवी मुंबई : गोपनीय माहितीच्या आधारे रबाळे पोलिसांनी सापळा रचून २५ किलो कॅनाबिस ड्रग जप्त केले आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. संशयास्पद कारच्या झडतीवेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आले.
ऐरोली परिसरात एका कारमधून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार कुंभार यांच्या पथकाने परिसरात ठिकठिकाणी पाळत ठेवली होती. यादरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित कारची झाडाझडती घेतली जात होती. त्यावेळी पोलिसांनी एम.एच.०५. बी.जे. ५०५१ क्रमांकाची कार अडवून त्याची झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगचा साठा आढळून आला. चौकशीत ते कॅनाबिस ड्रग असून त्यावर बंदी असल्याचे समोर आले. त्यानुसार कारमधील २५ किलो वजनाचे कॅनाबिस पोलिसांनी जप्त केले असून कार चालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने हे ड्रग कुठून आणले याचा अधिक तपास सुरू असल्याचे सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले.