केरळ आपत्तीग्रस्तांना महापालिकेची २५ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:51 AM2018-08-23T01:51:54+5:302018-08-23T01:52:20+5:30
नागरिकांनाही मदतीचे आवाहन; उपमहापौरांनी दिले एक महिन्याचे मानधन
नवी मुंबई : केरळमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नवी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे करत २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही एक महिन्याचे मानधन दिले आहे.
राष्ट्रीय आपत्तीच्या काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेने २५ लाख रुपये दिले आहेत. वाशीमधील केरळ भवनमध्ये जाऊन हा धनादेश तेथील व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, रवींद्र इथापे, रवींद्र पाटील, साबू डॅनीयल व इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईमधील प्रत्येक नागरिकाने त्यांना शक्य होईल तेवढी मदत केरळमधील आपत्तीग्रस्तांना करावी, असे आवाहन या वेळी महापौर जयवंत सुतार यांनी केले. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनीही एक महिन्याचे मानधन आपत्तीग्रस्तांना देऊन शहरवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे.
एपीएमसीमधूनही कर्मचारी सेनेची मदत
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचारी सेनेनेही केरळ आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. लवकरच मदत संकलित करून ती आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी सेनेचे नारायण महाजन यांनी दिली. शहरातील सामाजिक संघटनांनी, व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात मोफत धान्य उपलब्ध करून आपत्तीग्रस्तांना मदत केली आहे.