नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईसह एकूण पाच महापालिकेच्या निवडणुकीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )आणि भाजपसोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आम्ही २५ जागांची मागणी केली असून भाजपाची सत्ता आल्यास महापौर भाजपाचा असेल तर उपमहापौर आरपीआयचा असा आमच्या पक्षाचा आग्रह राहील, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री तथा आरपीआयचे राष्टीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी वाशी येथे आयोजित ‘मी रिपब्लिकन’कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
यावेळी आरपीआयचे राष्टीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, माजी मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, युवा नेते यशपाल ओहोळ आदी उपस्थित होते. आरपीआय (आठवले ) पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. रामदास आठवले म्हणाले की, आठ ते दहा जागांवर आरपीआयचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.