उंदीर मारण्यासाठी २५ हजारांचा भुर्दंड
By admin | Published: July 4, 2017 07:14 AM2017-07-04T07:14:42+5:302017-07-04T07:14:42+5:30
पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही
नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पालिका प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांबरोबर उंदरांचा उपद्रव रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मूषक नियंत्रणाचा पालिकेच्या तिजोरीवरही भार पडू लागला आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च झाले आहेत. रोज पालिकेच्या तिजोरीतील २५ हजार रुपये यासाठी खर्च झाले असून, वर्षभरामध्ये १ लाख ४३ हजार उंदीर मारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील कारभार दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या नावाखाली प्रत्येक वर्षी १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केला जात आहे; पण प्रत्यक्ष या पैशांचा योग्य वापर होत नाही. आरोग्यावरील खर्च व्यर्थ होऊ लागला आहे. श्वान व मूषक नियंत्रण कार्यक्रमावरील खर्चही असाच पाण्यात जात आहे. २०१५-१६ वर्षामध्ये श्वान निर्बीजीकरणावर तब्बल १ कोटी ३ लाख रुपये खर्च झाले आहेत. एवढा प्रचंड खर्च करून फक्त ५१०७ श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
वास्तविक शहरातील श्वानांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक वर्षी किमान १२ ते १५ हजार श्वानांवर शस्त्रक्रिया होणे आवश्क आहे; पण निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आलेल्या अपयशामुळे हे उद्दिष्ट साध्य करणे पालिकेला शक्य झालेले नाही. मूषक नियंत्रण कार्यक्रमाच्या बाबतीमध्येही हाच प्रकार होत आहे. आयुक्तांच्या अधिकारामध्ये डिसेंबरमध्ये तब्बल २४ लाख ६७ हजार रुपयांचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे.
पालिकेच्या वार्षिक प्रशासन अहवालामध्ये मूषक नियंत्रणाविषयी दिलेली आकडेवारी धक्कादायक आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये मूषक नियंत्रणासाठी ४८५२ पिंजऱ्यांचा उपयोग करण्यात आला.
वर्षभर ६ लाख २४ हजार ३३९ बिळे धूरीकरण करण्यात आली व तब्बल १ लाख ४३ हजार २५ उंदीर मारण्यात आले आहेत. उंदीर मारणे, पिंजरे खरेदी व धूरीकरणासाठी तब्बल ९२ लाख ३२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर ३६५ दिवसांमध्ये रोज सरासरी ३९१ उंदीर मारण्यात आले असून, यासाठी रोज २५२९३ रुपये खर्च करण्यात आले आहेत.
उंदरांचा उपद्रव वाढला असल्यास तक्रार कोणाकडे करायची. पिंजऱ्याची किंवा धूरीकरणाची आवश्यकता असल्यास कोणाशी संपर्क साधायचा? याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याने उंदरांचा त्रास होत असतानाही नागरिकांना वैयक्तिक खर्च करून उपाययोजना करावी लागत आहे.
उंदरांमुळे प्रचंड नुकसान
शहरामध्ये उंदरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत. झोपडपट्टीसह विकसित नोडमध्येही उंदरांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोसायटी आवारामध्ये उभ्या वाहनांची वायर कुरतडण्याचे प्रकार नियमित घडत आहेत. कार्यालयातील संगणक व इतर साहित्याची नासधूस होत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पालिकेच्या कोणत्या विभागाकडे याविषयी तक्रार करायची व धूरीकरणासह इतर उपाययोजना कोण करते? याविषयी माहिती नागरिकांना नसल्याने नुकसान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.