नवी मुंबई : प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईची संकल्पना साकारण्यासाठी शहरात प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाईचा बडगा सुरू असून गेल्या दोन महिन्यात २५ टन प्लॅस्टिक जप्त व १५ लाखांची दंड वसुली करण्यात आली आहे.शहरात प्लॅस्टिक बंदी राबविण्यासाठी तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर रोखण्यासाठी होळी सणापासून मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. याअनुषंगाने प्लॅस्टिकच्या किरकोळ विक्र ीवर प्रतिबंध आणण्यासोबतच त्यांच्या साठ्यांवरही मोठ्या प्रमाणात धाडी घालून धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. सोमवारी १३ मे रोजी करावेगाव येथे प्लॅस्टिक वापरणाºया व्यावसायिकावर कारवाई करीत त्यांच्याकडून ३0 किलो प्लॅस्टिक व ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत प्लॅस्टिक कारवायांमध्ये वाढ झाली असून दोन महिन्यांच्या कालखंडात २५ टन ५१२ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून १५ लाख ४५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.नवी मुंबई शहरातील कारवाई ही राज्यातील इतर शहरांपेक्षा मोठी असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. यापुढे देखील प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा शहरातील सर्वच विभागांत राबविण्यात येणार असून स्वच्छताप्रेमी शहरातील नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे टाळून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
प्लॅस्टिकचा २५ टन साठा जप्त; महापालिकेची दोन महिन्यांतील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:49 AM