पालिकेतील २६ अभियंत्याकडे व्यवसायिक पात्रताच नाही
By admin | Published: November 26, 2015 01:42 AM2015-11-26T01:42:00+5:302015-11-26T01:42:00+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या २६ पैकी एकाही अभियंत्याने नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रच सादर केले
धीरज परब, मीरारोड
मीरा भार्इंदर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या २६ पैकी एकाही अभियंत्याने नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रच सादर केले नसल्याने शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तथा उपअभियंत्यांना दिलेल्या वेतनवाढीत व पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर शासनाच्याच एका परिपत्रकाचा आधार घेऊन श्रेणीवाढ मागणाऱ्या २० कनिष्ठ अभियंत्यांना महासभेचा ठराव होऊनदेखील व्यावसायिक परीक्षा प्रमाणपत्रच नसल्याने श्रेणीवाढ मिळणे अवघड ठरणार आहे.
अभियंत्यांना व्यावसायीक परिक्षा देणे बंधनकारक आहे. मात्र ती उत्तीर्ण होण्याकडे अभियंत्यांकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य शासनाने ३० आॅगस्ट २००६ रोजी परिपत्रकावरून दिसते. यापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांनी विहीत केलेली व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्यांची वेतन वाढ रोखण्यासह कालबद्ध पदोन्नती वा आश्वासित प्रगती योजनेवरील वेतनश्रेणी आणि वरिष्ठ पदावरच्या पदोन्नतीसाठी विचार करण्यात येऊ नये, असे शासनाने स्पष्ट केले होते. परिपत्रकाच्या दिनांकापासून ४ वर्षांच्या कालावधीत आणि ३ प्रयत्नांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधीदेखील शासनाने दिली होती. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांचे वय ४५ वर्षे पूर्ण होईल त्यांना त्या दिनांकापासून सदर परिक्षेतून सूट देऊन उक्त लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली होती.
जुलै २०१३ मध्येदेखील प्रशासनाच्या पडताळणीत शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व दीपक खांबित, उपअभियंता शरद नानेगावकर, किरण राठोड, नितीन मुकणे सह २१ कनिष्ठ अभियंते व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झालेच नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीदेखील संबंधित अभियंत्यांना लेखी पत्र द्यावे व विहीत मुदती नंतर सुद्धा प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर शासन परिपत्रकानुसार कारवाई करावी, असे उपायुक्त मुख्यालय यांनी स्पष्ट केले होते. अभियंत्यांकडे वजनदार खाती असल्याने पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. दुसरीकडे कनिष्ठ अभियंते मात्र पाटबंधारे विभागाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन ५ वर्ष सेवा पूर्ण झाल्याने वर्ग २ च्या शाखा अभियंता म्हणून श्रेणीवाढ देण्याची मागणी २००८ साला पासून महापालिके कडे करत होते. २२ जुलै २०१५ रोजी झालेल्या महासभेत तसा प्रस्ताव खुद्द आयुक्त अच्युत हांगे यांनीच आणला होता. महासभेने देखील त्यास मंजुरी दिली होती.
व्यावसायिक परिक्षाच उत्तीर्ण नसल्याने श्रेणीवाढ देणे बेकायदेशीर ठरणार असले तरी महासभेचा ठराव शासना कडे मंजुरीसाठी पाठवण्याची धडपड सुरु होती. मात्र ३० आॅक्टोबर रोजी आयुक्तांनी सर्व संबंधित अभियंत्यांना परिपत्रक काढून ३ दिवसात व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. अपेक्षे प्रमाणे एकाही अभियंत्याने ते सादर केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.