म्हसळ्यातील २६ गावे तहानलेली
By Admin | Published: April 11, 2016 01:31 AM2016-04-11T01:31:36+5:302016-04-11T01:31:36+5:30
उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली
अमोल जंगम, म्हसळा
उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. म्हसळा पंचायत समितीने तालुक्यातील पाच गावे व २१ वाड्यांचा पाणीटंचाई कृती निवारण आराखड्यात समावेश केला आहे. मे महिन्यात म्हसळा शहरासह तालुक्यातील अन्य गावांच्या घशाला कोरड पडण्याच्या शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.
तीव्र पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती निवारण आराखडा तयार केला आहे. ही दर वर्षाची पाटी प्रशासन पुन:पुन्हा वापरत आहे. मुळात रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सभा घेण्यापलीकडे प्रयत्न होताना दिसत नाही. शिवाय राष्ट्रीय पेय जल योजना, प्रादेशिक नळ पाणी, स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षे टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्याचा या वर्षीही पाणीटंचाईने पिच्छा सोडलेला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला व भौगोलिकदृष्ट्या चढउतार, डोंगराळ असलेल्या म्हसळा तालुक्यात मुबलक पाणीसाठे व नैसर्गिक स्रोत आहेत. म्हसळा तालुक्यातील ८४ गावांची सुमारे ६१ हजार लोकसंख्या आहे. ८४ गावांसाठी ८४ नळ पाणी योजना व १३ गावांसाठी एक प्रादेशिक नळ पाणी योजना कार्यान्वित आहे. तालुक्यातील पाभारे, आंबेत व म्हसळा शहरासाठी तत्कालीन पालक मंत्री आ. सुनील तटकरे यांनी २००९ मध्ये तब्बल पाच कोटी २५ लाख रु पये एवढा निधी मंजूर केला. मात्र तीनही योजना स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे मागील पाच वर्षे अपूर्ण आहेत.
टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना म्हणून विंधन विहीर बांधल्यास समस्या सुटेल. यासाठी शासनाला २६ विंधन विहीर बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रत्येक विहिरीमागे ६० हजाराप्रमाणे १७ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. विंधन विहिरीचा प्रयोग काही ठिकाणी करण्यात आला व शासनाचे पैसे निव्वळ वाया गेले असताना पुन्हा तोच घाट कशाला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेली तीन-चार वर्षे वनबंधारे बांधलेच जात नसल्याने म्हसळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.