- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ग्राहकांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईपेक्षा सुकामेव्याला मागणी वाढली आहे. दोन आठवड्यात मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल २६०० टन सुकामेव्याची विक्री झाली आहे. काजू, बदामसह खजुरालाही ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.
देशातील सर्वात मोठी सुकामेव्याची बाजारपेठ मुंबई बाजार समितीमध्ये आहे. दिवाळीमध्ये दोन आठवडे बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुकामेव्याची प्रचंड उलाढाल होत असते. जगभरातून सुकामेवा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत असतो. शासनाने मार्केटबाहेर बाजार समितीचा अधिकार कमी केल्यामुळे हा व्यापार खुला झाला असला तरी अद्याप मुंबई, नवी मुंबई परिसरातील किरकोळ विक्रेते बाजार समितीमधून खरेदी करण्यास पसंती देत आहेत.
मागील काही वर्षांत नागरिकांची आरोग्याविषयी जागृती वाढली आहे. कोरोनामुळेही आरोग्याचे महत्त्व पटले असून, दिवाळीमध्ये आरोग्याला घातक गोड मिठाईपेक्षा सुकामेवा खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. दिवाळीपूर्वी दोन आठवडे हंगाम सुरू होतो. यावर्षी बाजार समितीमध्ये जवळपास २६०० टन विक्री झाली आहे. काजू, बदाम, आक्रोड, पिस्ता, खजूर व किसमिस यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. जवळपास सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल या व्यापारातून झाल्याचा अंदाज आहे. उद्योजक, राजकीय नेते, ठेकेदारही दिवाळीमध्ये सुकामेव्याची मिठाई भेट देत आहेत. यासाठी १० ते १५ दिवस अगोदर खरेदी करतात.
यावर्षी सुकामेव्याचे दर उत्सव काळातही स्थिर असल्यामुळे ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत होता. सुकामेव्याचे आरोग्याविषयी फायदे लक्षात आल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद वाढू लागला आहे. - कीर्ती राणा, माजी संचालक, मसाला मार्केट
१५ दिवसात बाजार समितीमधील आवकवस्तू आवक (टन) काजू ४२६बदाम ६९६खजूर ५१७खारीक ७७३किसमिस १२७अक्रोड ६८पिस्ता ७५