नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-भिवंडी आणि नवी मुंबई या पाच महानगरांना जोडणाऱ्या एकूण दोन मेट्रो मार्गांच्या स्थापत्य व प्रणाली कामांसाठी अखेर एमएमआरडीएसला सल्लागार मिळाले आहेत.यातील मेट्रो मार्ग क्रमांक-१० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए. आणि मेसर्स डी. बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबीच यांच्या संयुक्त निविदेस एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता दिली आहे. सल्लागारांवरील ही रक्कम २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये आहे.
मेट्रो मार्ग क्रमांक १०मेट्रो-७ चा विस्तार करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे मेट्रो-१०चा प्रकल्प मांडण्यात आला आहे. मेट्रो-१० ने हा गायमुख ते शिवाजी चौक ९.२०९ किमीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४,४७६ कोटी इतका असून, त्यावर गायमुख, गायमुख रेती बंदर, वर्सोवा चारफाटा, काशीमीरा, शिवाजी चौक ही स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई, बोरीवली, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड व ठाणे येथील नागरिकांना फायदा होणार आहे.
जमीन संपादनासह खारफुटींचा मोठा अडथळास्थापत्य व प्रणाली कामांसाठी आता सल्लागार नेमण्यास मंजुरी मिळाली असली तरी या सर्व मार्गांत पर्यावरण विषयक मंजुऱ्यांचा मोठा अडथळा राहणार आहे. कारण खासगी जमिनींच्या संपादनासह खाडीपात्र बुजवून खारफुटींची कत्तल त्यासाठी करावी लागणार असून, यासाठी पर्यावरण मंत्रालयांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. या मंजुऱ्या कधी मिळतात, त्यावरच हे सर्व प्रकल्प किती गती पकडतात, हे अवलंबून आहे.
मेट्रो मार्ग क्रमांक १२मेट्रो-१२ हा मेट्रो-५ चा विस्तार असणार असून संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४,४७६ कोटी इतका असून, या मार्गात १७ स्टेशन्स असणार आहेत. यात एपीएमसी कल्याण, गणेशनगर, पिसावलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा यांचा समावेश आहे.
कोणाला होणार फायदा? या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे.