२७ गावे महायुतीच्या विरोधात करणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:45 PM2019-04-08T23:45:58+5:302019-04-08T23:46:17+5:30
संघर्ष समितीचा निर्णय. मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात सभा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेली २७ गावे वेगळी करून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, ते पाळले नसल्याने महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे.
संघर्ष समितीची जाहीर सभा रविवारी मानपाडेश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या सभेला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पदाधिकारी अर्जुन चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत अध्यक्ष शेलार यांनी समितीच्या कोअर कमिटीने घेतलेला निर्णय ग्रामस्थांच्या सभेत जाहीर केला.
२७ गावे महापालिकेतून वेगळे करण्याचे आश्वासन आॅक्टोबर २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतरही त्यांनी वारंवार या आश्वासनाचा उच्चार केला. मात्र, त्याची पूर्तता आजपर्यंत केलेली नाही. २७ गावांना केवळ झुलवत ठेवले. यापूर्वी महापालिका निवडणुकीवर समितीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा बहिष्कार मोडीत काढण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उमेदवार त्यांनी उभे केल्याने समितीला बहिष्काराचा पवित्रा मागे घ्यावा लागला.
शिवसेना-भाजपाच्या मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी २७ गावांच्या डोळ्यांत धूळ फेकली आहे. आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला २७ गावे मतदान करणार नाहीत. त्याऐवजी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
शेलार यांनी सांगितले, ‘भाल, भोपर आणि शीळ येथे डम्पिंग ग्राउंडचे आरक्षण आहे. सरकारने ते हटवले नाही. २७ गावांत अन्य भागांतील कचरा आणून २७ गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा घाट सरकारने घातला आहे. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली, त्यापूर्वी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या राजवटीत जो मालमत्ताकर होता, तो नगण्य होता. आता महापालिकेने दहापटीने जास्त मालमत्ताकराची आकारणी केली आहे. कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण सुरू केले आहे. परंतु, या रस्त्यात बाधित असलेल्यांना अद्याप मोबदला दिला नसताना जबरदस्तीने प्रकल्पाचे काम केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची नाराजी आहे.’
बिल्डरांच्या फायद्यासाठी ग्रोथ सेंटर
राज्य सरकारने बड्या बिल्डरांच्या फायद्यासाठी २७ गावांच्या परिसरात कल्याण ग्रोथ सेंटर आणले आहे. त्याला २७ गावांतील नागरिकांचा विरोध आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे. या विविध मुद्यांचा उल्लेख सभेत शेलार यांनी केला.