एलिफंटा बेटावरील २७२ मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या यादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 05:48 PM2023-05-30T17:48:30+5:302023-05-30T17:49:01+5:30

२० किमी अंतरावर असलेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई: एक किमी अंतरावरील मच्छीमारांना डावळल्याने एलिफंटावासी संतप्त 

272 fishermen from elephanta Island were excluded from the list of financial compensation | एलिफंटा बेटावरील २७२ मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या यादीतून वगळले

एलिफंटा बेटावरील २७२ मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या यादीतून वगळले

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण: देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी न्हावा-शेवा (एमटीएचएल) सागरी सेतूमुळे जागतिक एलिफंटा बेटावरील पारंपरिक मासेमारी नष्ट झाली आहे. या सागरी सेतूमुळे बाधीत झालेल्या २० किमी अंतरावर असलेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या बेटावरील २७२ पारंपरिक स्थानिक हात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना नाकारण्यात आली आहे.याआधी नुकसान भरपाई म्हणून जाहीर झालेल्या १५ मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळाली आहे.मात्र  गतिमान सरकार सत्तेवर येताच बेटाचे नाव अचानक यादीतूनच वगळण्यात आले आहे. गतिमान सरकारच्या या अनोख्या राजकीय निर्णयामुळे मात्र बेटवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जागतिक एलिफंटा बेटांची राजबंदर,शेतबंदर मोराबंदर अशी तीन गावे आहेत.तीन गावे मिळून गावाची लोकसंख्या जवळपास १२०० आहे.पर्यटन आधारित उद्योग आणि पारंपरिक हात मासेमारी हेच बेटावरील रहिवाश्यांचे उपजिविकेचे साधन आहे.दोन वर्षांपासून बेटाच्या एक किमी अंतरावर देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी न्हावा-शेवा (एमटीएचएल) सागरी सेतू उभारण्यात येत आहे. २१ किमी लांबीच्या या सागरी सेतूच्या उभारण्याच्या कामामुळे  एलिफंटा बेटावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे २५२ मच्छीमार बाधीत झाले आहेत.त्याचा व्यवसायच या प्रकल्पामुळे धोक्यात आल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए ) ग्रामपंचायतीमार्फत आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.या मागणीला अनुसरून एमएमआरडीएने बेटावरील २८७ बाधीत मच्छीमारांपैकी १५ मच्छीमारांना एक वर्षापुर्वी आर्थिक नुकसान भरपाई दिली होती.उर्वरित २७२ पारंपारिक मच्छीमार अद्यापही आर्थिक नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.नुकसान भरपाईसाठी निवेदन,पत्र, सामुहिक आंदोलन,मोर्चेही काढून मच्छीमारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.मात्र प्रत्येक वेळी एमएमआरडीएने आश्वासन देऊन मच्छीमारांना वाटेला लावले आहे.

आर्थिक नुकसान भरपाईसाठी आमंत्रण, निमंत्रण, चर्चा त्यानंतर वाटाघाटीची प्रक्रिया सुरू असतानाच वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर अचानक एमएमआरडीएने पवित्रा बदलला आहे. बाधीतांमध्ये एलिफंटा बेटावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार मोडत नसल्याने २७२ पारंपारिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार नसल्याचा पवित्रा एमएमआरडीएने घेतला. एमएमआरडीएने अचानक आर्थिक नुकसान भरपाईच्या यादीतून एलिफंटा बेटावरील हात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना वगळल्याने बेटवासी संतप्त झाले आहेत.

याआधी एलिफंटा बेटावरील हात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर एमएमआरडीएने अचानक यादीतूनच एलिफंटा बेटावरील पारंपरिक मच्छीमारांना वगळले आहे.याप्रकरणी  एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (२९) भेट घेऊन पत्र देऊन विचारणा करण्यात आली असल्याची माहिती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर व उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

Web Title: 272 fishermen from elephanta Island were excluded from the list of financial compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण