अधिक नफ्याचे आमिष दाखवून २७४ जणांची केली फसवणूक; एपीएमसीतील कार्यालय गुंडाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:57 AM2019-05-16T00:57:48+5:302019-05-16T00:58:19+5:30
जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवी मुंबई : जादा नफ्याचे आमिष दाखवून बनावट कंपनीत नागरिकांना पैसे गुंतवण्यास सांगून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये २७४ जणांची ६० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुख १९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कंपनीचे कार्यालय थाटून त्याद्वारे गुंतवणूकदारांना जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली आहे. शक्ती मल्टीपर्पज सोसायटी असे कंपनीचे नाव असून एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये त्याचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्याठिकाणी ठरावीक वर्षासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यास दरमहिना नफ्याचे तसेच मुदतीनंतरही जादा रकमेच्या नफ्याचे आमिष दाखवले जात होते. तसेच इतरांनाही गुंतवणुकीस प्रोत्साहित केल्यास त्याचेही कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी दहा हजार रुपये ते एक लाखापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली होती. प्रत्यक्षात मात्र त्या सर्वांची फसवणूक झाली असून त्यापैकी २७४ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांची एकूण ६० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागामार्फत एपीएमसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील तीन वर्षापासून एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केटच्या आवारात शक्ती मल्टीपर्पज सोसायटीचे कार्यालय सुरू होते. कंपनीच्या दलालांमार्फत तसेच ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांच्यामार्फत इतरांनाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जात होते. मात्र ज्यांच्या गुंतवणुकीची मुदत संपली आहे, असे गुंतवणूकदार मागील काही महिन्यांपासून कंपनीच्या कार्यालयात फेऱ्या मारत होते. परंतु त्यांना नफ्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर काही दिवसांपूर्वी कंपनीचे कार्यालय गुंडाळून संबंधितांनी पळ काढल्याचे समोर आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष तसेच दलाल व कार्यालयातील कर्मचारी अशा १९ जणांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीचे पुण्यात देखील कार्यालय होते, असे काही गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. त्यानुसार इतर शहरातील नागरिकांना देखील गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.