पनवेलमध्ये 274 कुटुंबाचे वास्तव्य अतिधोकदायक इमारतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 12:02 AM2024-06-02T00:02:01+5:302024-06-02T00:02:24+5:30
धोकादायक इमारती मधील रहिवाशांचा जीव टांगणीला.
वैभव गायकर,पनवेल: मुंबई आणि उपनगरात धोकादायक ईमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात.दरवर्षी या घटनेत वाढ होत असते मात्र या घटनांना पूर्णविराम मिळत नाही.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक ईमारती घोषित केल्या आहेत.विशेष म्हणजे पालिकेने या ईमारती धोकादायक तर घोषित केल्या मात्र आजही या धोकादायक ईमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने भविष्यात याठिकाणी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे.या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक ईमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत.या 62 अतिधोकादायक ईमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत.पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक ईमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत.पनवेल नगरपरिषदेच्या काळापासून या ईमारती उभ्या आहेत.मध्यंतरी गणेश देशमुख पनवेल महानगरपालिकेचे अयुक्त असताना धोकादायक ईमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली.पालिकेने धोकादायक ईमारतीवर बॅनर लावुन धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये असे बॅनर लावले आहेत.मात्र या धोकादायक ईमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही.असा प्रश्न निर्माण झाला आहे.अतिधोकादायक ईमारती मध्ये खारघर मध्ये 3,कळंबोली मध्ये 180,कामोठ्यात 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंब अतिधोकादायक ईमारतीत वास्तव्यास आहेत.पालिकेने या ईमारतींची यादी जाहीर केली आहे.काही ईमारतींचे पाणी आणि वीज जोडणी देखील बंद करण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय हस्तक्षेप ? -
पालिकेने धोकादायक म्हणुन घोषित केलेल्या ईमारतींची वीज,पाणी बंद केल्यावर काही रहिवासी राजकीय नेत्यांचा वजन वापरून वीज पाणी पूर्ववत करत आहेत.अशा ईमारतीत दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? अशाप्रकारे राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य आहे.असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धोकादायक ईमारती पाडणार कोण ?-
धोकादायक घोषित केलेल्या अनेक ईमारती रिकाम्या देखील झाल्या आहेत.या ईमारती पडण्याची वाट बघायची कि पालिका या ईमारती स्वतः पाडेल असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
धोकादायक ईमारतींची यादी जाहीर केली आहे.या ईमारती मधील घरे रिकामी करण्याचे अवाहन देखील रहिवाशांना केले आहे.तसेच या ईमारती मधील वीज पाणी जोडणी बंद करण्यास सुरुवात केली आहे.
- मारुती गायकवाड (उपायुक्त्त,पनवेल महानगरपालिका )