खारघरमधून २७,६६,००० करवसुली
By admin | Published: November 18, 2016 03:50 AM2016-11-18T03:50:35+5:302016-11-18T03:50:35+5:30
खारघर ग्रामपंचायत हद्दीतील गावातून पनवेल पालिकेने प्रथमच २७ लाख ६६ हजार रुपयांची करवसुली केली आहे.
पनवेल : खारघर ग्रामपंचायत हद्दीतील गावातून पनवेल पालिकेने प्रथमच २७ लाख ६६ हजार रुपयांची करवसुली केली आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे शासनाने सरकारी देणी चुकवण्यासाठी जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याचे घोषित केले आहे. ग्रामस्थांनी थकीत कराचा भरणा केल्याने पनवेल महापालिकेच्या खारघर कार्यालयात २७ लाख ६६ हजारांची करवसुली झाली आहे.
पनवेल शहर महापालिकेचे कामकाज १ आॅक्टोबरपासून सुरू झाले आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर, ओवे, तळोजा परिसराची जबाबदारी अधीक्षक श्रीराम हजारे यांच्याकडे सोपविली आहे. हजारे यांनी खारघर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन २० आॅक्टोबरपासून पंचायत हद्दीतील खारघर, कोपरा, बेलपाडा आणि आदिवासी पाड्यात मालमत्ता, घरपट्टी भरण्याची नोटीस देण्यास सुरुवात केली. खारघर ग्रामपंचायत ही पनवेल तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ग्रामस्थांना घरपट्टीची नोटीस पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असे. पालिकेने नोटीस पाठविल्यानंतर ठरावीक ग्रामस्थांनीच घरपट्टीचा भरणा केला होता. दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे सरकारी करवसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे घोषित केल्याने दहा दिवसांत २७ लाख ६६ हजार करवसुली झाल्याची माहिती खारघर कार्यालयाकडून मिळाली. (प्रतिनिधी)