पनवेल शहरातील २८ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:45 AM2018-07-07T00:45:05+5:302018-07-07T00:45:54+5:30
पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काही ठिकाणी मालक व भाडोत्रींमध्ये वाद आहे. त्यामुळे लोक जीव धोक्यात घालून राहात असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पनवेलमधील जुन्या वाड्यांची जागा इमारतींनी घेतली असली तरी आजही काही जुनी बांधकामे शहरात आहेत. काही इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या असून त्यांची समजूतही घालण्यात आली आहे. मात्र, मालक आणि भाडोत्री यांच्यातील वाद या गोष्टीचा अडथळा निर्माण करीत आहे. दोन दिवसांपूर्वी रोटरी सर्कलमधील अग्रवाल कॉम्प्लेक्सच्या सज्जाचा भाग कोसळल्याने पनवेल शहरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशीच परिस्थिती पालिका हद्दीतील इतर ठिकाणीसुद्धा असल्याने आजच्या घडीला काही धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या नाहीत. सिडको हद्दीत नवीन पनवेल तसेच कळंबोली शहरात नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.
संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील झाले आहे. पालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायत हद्दीतदेखील मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारतींचा समावेश आहे. पालिकेमार्फत अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी ही संख्या ३० च्या वर जाण्याची शक्यता आहे.
धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. संबंधितांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त