२८ कोटींच्या विकासकामांना विशेष महासभेत मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:47 AM2021-01-09T00:47:49+5:302021-01-09T00:48:04+5:30

ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव तरतूद; प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील कामे करण्यास प्राधान्य

28 crore development works approved by special general body | २८ कोटींच्या विकासकामांना विशेष महासभेत मंजुरी 

२८ कोटींच्या विकासकामांना विशेष महासभेत मंजुरी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २८ कोटींच्या कामांना शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये रस्ते, गटारे, समाज मंदिराचे सुशोभीकरण आदींसह विविध कामांचा समावेश आहे.
पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण दि. ८ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि ड मधील गावातील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी वेगवेगळ्या ९२ कामांना महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या चार प्रभागांपैकी अ, ब आणि ड प्रभागामध्ये ही विकासकामे करण्यात येणार आहे. 


महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अ मधील रोहिंजण, तुर्भे, धरणा कॅम्प, पापडीचा पाडा, खुटुंकबांधन, खुटारी, एकटपाडा, पडघे, आडिवली, इनामपुरी, तोंडरे, नागझरी, कोपरा, ओवे, पेंधर, धरणा, पेठ, तळोजा घोट, धामोळे आदी गावांमध्ये ६२ कामांचा समावेश आहे. 
प्रभाग क्रमांक ब मध्ये खिडुकपाडा, वळवली, टेंभोडे, आसुडगाव, कळंबोली, रोडपाली या गावांमध्ये २४ कामांचा समावेश आहे. तर, प्रभाग ड मध्ये सहा कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या विकासकामांवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका लीना गरड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे लीना गरड यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी ही कामे तातडीने करून कामाचा दर्जा चांगला असल्याबाबत सूचना केल्या.यावेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. 


दुजाभाव थांबणे गरजेचे - लीना गरड
विकास हा सर्वांगीण होणे गरजेचे आहे. शहरी भागात विकास कामे होत नसताना, नागरिकांवर मालमत्ता कराचा बोजा दिला दिला जात आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात मालमत्ता कर न वाढवता, पालिकेचा निधी ग्रामीण भागासाठी वापरला जात आहे. हा दुजाभाव थांबणे गरजेचे असल्याचे सांगत, सत्ताधारी भाजपचा लीना गरड यांनी निषेध व्यक्त करीत भाजपला घरचा आहेर दिला

ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरिताच ही विकासकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. आम्ही या विकासकामांचा दर्जा टिकून राहावा, याकरिता या कामांवर लक्ष ठेवणार आहोत.
- परेश ठाकूर, सभागृह नेते

Web Title: 28 crore development works approved by special general body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.